कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या हस्ते ध्वजवंदन; म्हणाले, “आज प्रत्येक क्षेत्रात भारत जगात अव्वल”
77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात जनतेला संबोधित करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते.

कोल्हापूर : “जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून उदयास आलेल्या भारताला क्रांतिकारकांचा त्याग आणि महापुरुषांच्या प्रेरणेतून स्वातंत्र्य मिळालं. आज प्रत्येक क्षेत्रात भारत जगात अव्वल असून भारताचा गौरव आज जगभर पसरला आहे. अवकाशात झेपावणारी क्षेपणास्त्र असो, जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटवलेला ठसा असो अथवा ऑलिम्पिकच्या मैदानावर डौलानं फडकणारा तिरंगा या सर्वच माध्यमातून भारत एक कणखर राष्ट्र म्हणून उभं आहे,” असं प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं. 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात जनतेला संबोधित करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते.
महाराष्ट्राच्या मातीनं नेहमीच देशाला दिशा दिलीय : “1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांच्या शौर्यापासून ते क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानापर्यंतचा हा प्रवास अंत्यत खडतर होता. ब्रिटिशकालीन व्यवस्थेत महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवलं ते पूर्ण केलं. महाराष्ट्राच्या मातीनं नेहमीच देशाला दिशा दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतानं प्रत्येक क्षेत्रात साधलेली प्रगती फक्त तंत्रज्ञानाची नसून 135 कोटी भारतीयांच्या सामूहिक शक्तीची आहे,” असंही पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.
अनेक मान्यवरांची उपस्थिती : पोलीस परेड मैदानावर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, बॉम्बशोधक व नाशक पथक, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, श्वान पथक, वाहतूक शाखा तसंच विद्यार्थ्यांच्या एनसीसी पथकानं शिस्तबद्ध पथसंचलन करत ध्वजाला मानवंदना दिली. या सोहळ्याला कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कोल्हापूर सर्किट बेंच इथं पहिल्यांदाच ध्वजवंदन : 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उच्च न्यायालयात मुंबई अधिनस्त असलेल्या सर्किट बेंच (कोल्हापूर) इथं न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती एन बी सूर्यवंशी, न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी पोलीस विभागाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.याप्रसंगी न्यायमूर्ती श्री अवचट यांनी उपास्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

