महाराष्ट्र

लाचखोरीत महावितरणचा अभियंता अडकला; अंजनगाव सुर्जी येथे एसीबीची धडक कारवाई

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शासकीय कामात दिलासा देण्यासाठी कथितरीत्या लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीवरून महावितरण विभागातील सहाय्यक अभियंत्याला अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) अमरावती पथकाने सापळा रचून ताब्यात घेतल्याची कारवाई बुधवारी दुपारी अंजनगाव सुर्जी येथे पार पडली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, श्री. अजय विलास चौधरी (वय ३३), सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय अंजनगाव सुर्जी (वर्ग २) हे या कारवाईतील संबंधित लोकसेवक आहेत. ते सध्या  गणेश नगर, अंजनगाव सुर्जी येथे भाड्याने वास्तव्यास असून त्यांचा मूळ पत्ता मु. भादोड, पोस्ट पाणवाडी, ता. आर्वी, जि. वर्धा असा आहे.
तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या निवेदनानुसार, २७ जानेवारी रोजी महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन विद्युत मीटरमध्ये छेडछाड व वीजचोरीचा संशय व्यक्त करून मीटर काढून घेतल्याचे सांगितले. पुढील कार्यवाहीसाठी कार्यालयात बोलावण्यात आले असता, तक्रारदारावर वीजचोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो व दंड आकारला जाईल, असे सांगण्यात आल्याचा दावा आहे. मात्र, कथित गुन्हा दाखल न करण्यासाठी ₹४५,००० रुपयांची मागणी झाल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.
एसीबीने पडताळणी केली असता तडजोडीनंतर ₹३५,००० रुपयांवर मागणी निश्चित झाल्याचे समोर आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. त्यानुसार २८ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १.४० ते १.४८ या वेळेत महावितरण कार्यालय, अंजनगाव सुर्जी येथे सापळा कारवाई राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ₹३५,००० स्वीकारल्याचा एसीबीचा दावा असून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी (अमरावती ग्रामीण) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र अंतर्गत पार पडली. पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक श्री. सुनिल किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस शिपाई शैलेश कडू, वैभव जायले, तसेच चालक पो.उ.नि. सतीश किटूकले यांनी कारवाई केली.
दरम्यान, एसीबी अमरावती विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.