महाराष्ट्र

जनतेचा आवाज थेट अधिकाऱ्यांपर्यंत; जनसंवाद उपक्रमाचे आयोजन

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :   नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यांचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार तालुका स्तरावर ‘जनसंवाद व तक्रार निवारण’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, अंजनगाव सुर्जी येथे पार पडणार असल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन विशेष कार्य अधिकारी तथा महसूल मंत्री कार्यालय, महाराष्ट्र राज्य तसेच अमरावती जिल्हा प्रशासनाच्या पत्रानुसार करण्यात आले असून, यामध्ये पंचायत समिती प्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांसह नागरिकांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत नागरिकांच्या वैयक्तिक व सामूहिक तक्रारी, प्रलंबित विकास कामांची सद्यस्थिती, प्रस्तावित योजनांचे स्वरूप आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, अनुदान व सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शनही यावेळी केले जाणार आहे. विशेषतः अर्ज प्रक्रियेतील अडचणी, दस्तऐवजांतील त्रुटी, प्रलंबित प्रस्ताव आणि महसूल संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय यंत्रणांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तहसील कार्यालयाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या तक्रारी व मागण्यांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सोबत आणून निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, जेणेकरून प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करता येईल. प्रशासन-नागरिक संवाद अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके (दाभेराव) यांनी सर्व विभागीय अधिकारी व नागरिकांनी वेळेचे पालन करून कार्यक्रमात सहभाग नोंदवावा आणि लोकहिताच्या या उपक्रमास यशस्वी बनवावे, असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.