स्पर्धा परीक्षांच्या तयारीला नवी दिशा; अंजनगाव सुर्जी येथे दर्जेदार शिक्षणाचा भव्य शुभारंभ

–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत मोमेंटम कोचिंग इन्स्टिट्यूट या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या नव्या शाखेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. प्रभा मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्याला शहरातील शिक्षणप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले होते, तर संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पसारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मनोहर बेले, राकेश डोणगावकर, जयश्री कळमकर, नसीम फिरदोस सूफी, गोपाल डालके, गोरडे मॅडम, अरुण वर्मा, सुधाकर टिपरे, मनोज मेळे, गजानन चांदुरकर, तसेच अफसर भाई यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाखा संचालक अजय देशपांडे यांनी प्रास्ताविकात संस्थेची गरज, शैक्षणिक धोरण आणि IIT-JEE, NEET, CET, NDA व फाउंडेशनसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध सुविधा यांची सविस्तर माहिती दिली. ग्रामीण व उपनगरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी प्रमोद पसारे यांनी मनोगतात सांगितले की, अंजनगाव सुर्जीचे शैक्षणिक सामर्थ्य राज्याच्या नकाशावर ठळकपणे झळकावे यासाठी या शाखेची स्थापना प्रेरणादायी ठरेल. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांच्या साहाय्याने यश संपादन करण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने शहर व तालुक्यातील विविध शाळांमध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आणि उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा व्यवस्थापक सुरज मिश्रा यांनी प्रभावीपणे केले, तर सहव्यवस्थापक शुभम गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले. शहर व तालुक्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार मार्गदर्शनाची वाढती गरज लक्षात घेता या शाखेच्या स्थापनेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे प्रभावी केंद्र उपलब्ध झाले असून, परिसरातील शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये व्यक्त होत आहे.

