अंजनगाव सुर्जी-दर्यापूर रोड अंधारात; सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रीट लाईट बसवण्याची तात्काळ गरज
– सामाजिक कार्यकर्ते उमेश चौखंडे यांची मागणी

अंजनगाव सुर्जी- शहरात मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते उमेश चौखंडे यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची जोरदार मागणी केली आहे.
अंजनगाव सुर्जी ते अकोट राष्ट्रीय महामार्गावरील पारिख पेट्रोल पंप ते रेस्ट हाऊस दरम्यानचे स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. हा रस्ता शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असून, दिवसभर तसेच रात्री मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र, स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला दिसतो. यामुळे वाहनचालकांना रस्ता व्यवस्थित दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक नागरिकांनी या मार्गावर लहान-मोठे अपघात घडल्याचीही तक्रार केली आहे.
याशिवाय, अंधाराचा फायदा घेत काही असामाजिक तत्वांकडून गैरप्रकार होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. महिलांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी या मार्गाने जाणे टाळले जात आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, शहरातील नवीन बसस्थानक ते श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय दरम्यान दर्यापूर रोडवर अद्यापपर्यंत स्ट्रीट लाईट बसविण्यात आलेले नाहीत. हा परिसर शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असून, रोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवती, महिला, वृद्ध, या मार्गाने ये-जा करतात. मात्र, रात्रीच्या वेळी या भागात पूर्ण अंधार असल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः मुलींसाठी हा मार्ग असुरक्षित ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते उमेश चौखंडे यांनी या दोन्ही गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “स्ट्रीट लाईट ही केवळ सुविधा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक बाब आहे. अनेक महिन्यांपासून लाईट बंद असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे. यामुळे तात्काळ दुरुस्ती करून लाईट सुरू करणे गरजेचे आहे.”
तसेच, दर्यापूर रोडवर नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर यावर कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांच्या सहकार्याने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल.
स्थानिक नागरिकांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिला असून, प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मूलभूत सुविधांची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने बंद स्ट्रीट लाईट सुरू करावेत आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन लाईट बसविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

