“ज्ञानाचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी पुढे या” – जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

जिल्हा प्रतिनिधी अमरावती: देशाच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे संवर्धन आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा ठेवा सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयामार्फत “ज्ञानभारतम्” राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहीम व्यापक स्तरावर राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक संग्रहांमध्ये जतन केलेली हस्तलिखिते शोधून त्यांची नोंदणी, संवर्धन आणि डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने या मोहिमेत नागरिक, संस्था आणि संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. अनेक दुर्मिळ हस्तलिखिते मंदिरे, मठ, जुनी ग्रंथालये तसेच खासगी संग्रहांमध्ये आजही अस्तित्वात असून त्यामध्ये इतिहास, धर्म, आयुर्वेद, तत्त्वज्ञान, साहित्य आणि पारंपरिक ज्ञानाचा अमूल्य ठेवा दडलेला आहे. या मौल्यवान वारशाचे संरक्षण करून तो पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
या उपक्रमांतर्गत हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, पडताळणी, डिजिटायझेशन आणि राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल संग्रह निर्मितीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संबंधित हस्तलिखितांची मालकी मूळ धारकांकडेच कायम राहणार असून, इच्छुक व्यक्ती अथवा संस्था स्वेच्छेने ती शासनाकडे सुपूर्द करू शकतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे आणि शैक्षणिक घटकांचे सहकार्य घेतले जात असून पुराभिलेख संचालनालयाची राज्यस्तरीय नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरही विशेष समित्या आणि नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे.
हस्तलिखितांची माहिती संकलित करण्यासाठी “ग्यान भारतम्” हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे संबंधित माहिती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी, संशोधक, पारंपरिक विद्वान तसेच एनसीसी आणि एनएसएस स्वयंसेवकांचाही या मोहिमेत सक्रिय सहभाग राहणार आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, घरगुती संग्रह, जुनी वाचनालये, धार्मिक स्थळे किंवा संस्थांकडे उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांची माहिती पुढे आणणे ही सांस्कृतिक जबाबदारी आहे. भारताच्या वैभवशाली ज्ञानपरंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

