ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस अलर्ट! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ‘स्पीड गव्हर्नर’ ते ‘सीसीटीव्ही’

नियम मोडल्यास कारवाई : पहिल्याच दिवशी शालेय परिवहन समितीची बैठक

अमरावती : शहरातील शाळा, विद्यालये ३० जूनपासून पुन्हा गजबजली असून, विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित आणि नियमांनुसार व्हावी, यासाठी अमरावती शहर पोलिस प्रशासन पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मंगळवारी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस आयुक्त कार्यालयात शालेय परिवहन समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्यासह वाहतूक शाखांचे अधिकारी आणि स्कूल बस चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शाळांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. हॉलीक्रॉस मराठी शाळेसमोरील मार्ग ‘वन वे’ करणे, गर्ल्स हायस्कूल येथील एस.टी. बस थांबा पुढे नेणे, पोदार शाळेजवळील पोटे पाटील चौक येथील सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करणे आणि मनिबाई गुजराती शाळा परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची सूचना अध्यक्षांनी दिल्या. बैठकीला वाहतूक शाखेची पोलिस निरीक्षकत्रयी दीप्ती ब्राम्हणे, वैभव पानसरे, नीलेश गावंडे उपस्थित होते.

या सूचना पाळाव्याच लागतील…

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्पीड गव्हर्नर असणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी न बसवणे, वाहनात अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी आणि संकटकालीन दरवाजा सुस्थितीत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच स्कूल बस चालकांची नियमित नेत्र तपासणी आणि आवश्यकतेनुसार महिला वाहक नेमण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अनधिकृत किंवा अनियमित वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक विभागाकडून मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.