साताऱ्यातील घाटमाथ्याला रेड अलर्ट! पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी, महाबळेश्वरमध्ये चोवीस तासात 473 मिमी पाऊस
साताऱ्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सातारा – पश्चिम घाटमाथ्यावर आज अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण आणि सातारा या पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर याठिकाणी तब्बल 975 मिलीमीटर पाऊस झाला आहे. एकट्या महाबळेश्वरात 473 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 75 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असून चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात पावणे सात टीएमसीने (6.76 टीएमसी) वाढ झाली आहे.
शाळांना सुट्टी जाहीर – सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज (6 जुलै) सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई आणि सातारा या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, मेढा-महाबळेश्वर मार्गावर केळघर घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस – कोयना धरणात रविवारी सायंकाळी 5 वाजता 17.80 टीएमसी (उपयुक्त) पाणीसाठा होता. सोमवारी सकाळपर्यंत त्यात प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. आज सकाळी 8 वाजता पाणीसाठा 22.54 टीएमसी झाला आहे. गेल्या चोवीस तासातील पावसाची आकडेवारी पाहता कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाली आहे. महाबळेश्वरमध्ये 473 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 257 तर नवजा येथे 244 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे महाबळेश्वरातील लिंगमळा धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद झाला असून पर्यटकांना तिकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
नद्या दुथडी भरून वाहू लागल्या – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रात सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 78,322 क्युसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे. आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील मोरणा, महिंद, सातारा तालुक्यातील ठोसेघर, महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. कोयना, कृष्णा या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

