सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केल्याने जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलंय.

सिंधुदुर्ग – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अनुकूल हवामानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 95.12 मिमी पावसाची नोंद झाली असून, कणकवली तालुक्यात सर्वाधिक 180 मिमी पाऊस कोसळला आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या संततधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी घरे, गोठ्यांची पडझड होऊन लाखो रुपयांची हानी झाली आहे. झाडे उन्मळून पडली असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याने जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलंय.
अनेकांच्या छपरावरील पत्रे वाऱ्याने उडालेत : वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे, गोठे, मांगर, शेडचे नुकसान झाले असून, अनेकांच्या छपरावरील पत्रे वाऱ्याने उडालेत. लाखो रुपयांची हानी झाली आहे. मुख्य रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गावर झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सखल भागातील पुलांवरून पाणी वाहू लागल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून, प्रशासनाकडून रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील विष्णू सोमा राऊळ यांच्या घरावर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळामुळे फणसाचे मोठे झाड कोसळून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले. घटनास्थळी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह महसूलच्या पथकाने मदतकार्य केले. तर कुडाळ तालुक्यातील आकेरी दांड्याचे गाळू येथे वटवृक्ष इमारतीवर कोसळला. यात अन्य झाडेही पडून त्याखाली दोन कार, दुचाकी सापडून मोठी हानी झाली. नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही धरणेही पूर्ण क्षमतेने भरली असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे धरण परिसरातील गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केलंय.
अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आलंय. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील म्हाराटी-बेरडकी येथे शुक्रवारी मध्यरात्री वादळी वाऱ्याने थैमान घातले. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या वादळाने या भागाला जोरदार तडाखा दिला. यात कौलारू आणि मातीची घरे काही क्षणांतच कोसळली. या नैसर्गिक आपत्तीत तीन कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत. इतरही अनेक घरांचे प्रचंड नुकसान झालंय.

