अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे निर्देश: पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावांना पिण्याच्या पाण्याचा कोणताही जवळचा स्रोत नसल्यामुळे तब्बल १५ किमी अंतरावरून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली.
या बैठकीत बोलताना त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ‘जल जीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.या महत्त्वाच्या बैठकीला आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अमगोथू रंगानायक यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

