ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मुंबई पाऊस दुर्घटना प्रकरण : अमित साटम यांच्या विरोधात मनसेचं ‘जोडे मारो’ आंदोलन

मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडं, घरांच्या भिंती आणि चाळ कोसळून जीवितहानी झाली. या जीवितहानीला सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडं, घरांच्या भिंती आणि चाळ कोसळून जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) आज राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात आक्रमक आंदोलन छेडलं. दादरसह मुंबईतील विविध भागांत मनसे कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार अमित साटम यांच्या छायाचित्राला प्रतिकात्मक ‘जोडे मारो’ आंदोलन करत सरकारच्या निष्काळजी कारभाराचा निषेध व्यक्त केला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांचे बळी : पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी झाडांची छाटणी, धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण, नालेसफाई आणि आपत्कालीन उपाययोजनांचे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांना जीव गमवावा लागत आहे. पावसामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूसाठी सरकार आणि संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे आंदोलनकर्त्यांनी केली.

 

तीन मजली चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू : रविवारी मानखुर्द येथील जनता नगर परिसरात तीन मजली चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटनांमध्येही नागरिकांचा मृत्यू झाला. या सलग दुर्घटनांमुळे मुंबईतील जुन्या इमारती, धोकादायक झाडं आणि पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दादरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी अमित साटम यांच्या छायाचित्राला जोडे मारत प्रतिकात्मक निषेध नोंदवला. “मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणारं सरकार हद्दपार करा”, “निष्काळजी प्रशासनाचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मनसेनं ऐरणीवर आणला.

दोषींवर कठोर कारवाई करा : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटलं की, “मुंबईतील धोकादायक इमारती, झाडं आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीनं ठोस निर्णय घेतले नाहीत, तर आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल. केवळ दुर्घटनांनंतर मदत जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही. नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.”

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.