यवतमाळात पाेलिस वहसातीला लागून गुटख्याचे गाेदाम; कुमारच्या घरातून पुरवठा

यवतमाळ : जिल्ह्यात कॅन्सरचा विळखा वाढत असताना प्रतिबंधित गुटख्याची मात्र सर्रास विक्री सुरू आहे. यवतमाळ शहरातून कुमारने माेठे नेटवर्क उभे केले हाेेते. पाेलिस त्याच्या सातत्याने संपर्कात हाेते. मात्र, काेणीही त्याच्यावर कारवाई केली नाही. अगदी पाेलिस वसाहतीला लागून पळसवाडी कॅम्प परिसरातच गुटखा साठविण्याचे गाेदाम तयार केले हाेते. सर्वश्रुत गाेदामावर रविवारी दुपारी शहर पाेलिसांच्या शाेध पथकाने धाड टाकली. येथे तब्बल कारसह ४० लाखांचा मुद्देमाल मिळाला.
कुमार रामचंद्र ओचाणी (३७, रा. पळसावाडी सिंधी कॅम्प, यवतमाळ) असे गुटखा तस्कराचे नाव आहे. कुमार हा व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहे. कायद्यातील त्रृटींमुळे त्याच्यावर कठाेर कारवाई झाली नाही. यापूर्वी त्याला पांढरकवडा येथे टाेलनाक्यावर गुटख्यासह पकडण्यात आले हाेते. २०२३ मध्ये अन्न सुरक्षा अधिकारी व पाेलिसांनी पांढरकवडा येथे त्याच्याविरुद्ध प्रतिबंधित गुटखा तस्करी करत असल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली हाेती. त्यानंतर ताे जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याने गुटखा विक्रीचा व्यवसाय जाेरात सुरू केला. याच ‘कुमार’च्या गुटखा सेटिंगमध्ये तीन पाेलिस शिपाई काही महिन्यांपूर्वीच निलंबित झाले हाेते. याची चाैकशीसुद्धा त्यावेळी झाली. मात्र, गुटखा आपले काम नाही, असे म्हणत नंतर कुमार साेबत जुळवून घेण्यात आले.
ही कारवाई उपअधीक्षक अमोळ कोळी, शहर ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश सपकाळ, निलेश मिश्रा, जमादार रावसाहेब शेंडे, किरण पडघन, गजानन धात्रक, प्रदीप कुरडकर, पवन तडसे, पवन नांदेकर, गौरव ठाकरे, मयुर तेल्लेवार, कुणाल पांडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांनी संयुक्त रित्या केली आहे.
विदर्भ – तेलंगणातील नेटवर्क रडावर
‘कुमार’च्या माध्यामतून विदर्भ व तेलंगणातील नेटवर्क उघड हाेण्याची शक्यता वाढली आहे. आता त्या दिशेने तपासाची गरज आहे. अकाेला, अमरावती, कारंजा, वाशिम यासह यवतमाळ जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांतील गुटखा विक्रीच्या नेटवर्कमध्ये कुमार गुंतला आहे. त्याने हे जाळे थेट तेलंगणापर्यंत विणले आहे. त्यामुळे एका कारवाईत संपूर्ण नेटवर्कच बाहेर काढण्याची संधी चालून आली आहे.

