मोशी कचरा डेपो दुर्घटना : 9 जणांच्या मृत्यूनंतर महापालिकेची कारवाई; पर्यावरण विभाग, ठेकेदार कंपनीला नोटीस
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढीग कोसळून दुर्घटना घडली होती.

पिंपरी-चिंचवड : येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच संबंधित ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल यांना नोटीस बजावण्याचे निर्देश पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (12 जुलै) महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,तृप्ती सांडभोर,विक्रांत बगाडे,सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तसेच, या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह संबंधित ठेकेदार कंपनीला तातडीने नोटीस बजावण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दुर्घटनेची कारणं आणि संभाव्य निष्काळजीपणाची चौकशी करून पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
8 जुलै रोजी दुपारी घडली घटना : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजता ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढीग कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. त्यावेळी इमारतीत 22 कर्मचारी, तर इमारतीलगत कचऱ्याच्या ढिगाजवळ एक व्यक्ती उपस्थित होती. असे एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.
दुर्घटनेनंतर इमारतीतील 5 जण स्वतःहून सुरक्षित बाहेर पडले. त्यानंतर भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतलं. या मोहिमेत ढिगाऱ्याखालून 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, प्रशासकीय इमारतीत अडकलेल्या अन्य 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
84 तास चालली शोधमोहीम : शोधमोहीमेदरम्यान सर्वप्रथम भावेश वाणी यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं. त्यांना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं.
यानंतर शनिवारी (11 जुलै) दिवसभरात अक्षय सावंत (वय 35, मोशी), सुनील कोरके (वय 40, आळंदी), सन्नी माने (वय 39, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय 33, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय 26, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय 22, मोशी) आणि राहुल गायकवाड (वय 35, मोशी) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्वांना वायसीएम रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलं.
शनिवारी मध्यरात्रीनंतर, सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान वामन कसबे यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. त्यांनाही वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांनाही मृत घोषित केलं. अशा प्रकारे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वर पोहोचला. या दुर्घटनेत अडकलेल्या सर्व कामगारांचे शोधकार्य पूर्ण झाल्याने तब्बल 84 तास चाललेली ही बचावमोहीम रविवारी मध्यरात्री दोन वाजता थांबविण्यात आली.
‘घटना केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार’ : मोशी कचरा डेपोमध्ये घडलेल्या घटनेबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं होतं. त्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि मृतांच्या कुटुंबीयांना पूर्ण मदत देण्याची मागणी केली.
वडेट्टीवारांनी मोशी कचरा डेपोमधील घटनेचे वर्णन ‘हृदयद्रावक’ असं केलं. त्यांनी मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ही घटना केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, असं नमूद करत त्यांनी कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षा उपाययोजनांमधील निष्काळजीपणा तसेच संबंधित यंत्रणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, यावर वडेट्टीवार यांनी भर दिला. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि जखमींवर योग्य वैद्यकीय उपचार देण्याची जबाबदारी राज्य सरकारनं त्वरित पार पाडावी, असं आवाहन त्यांनी सोमवारी केलं.

