ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार! अमरावतीच्या लोणी गावातील ‘पाजणकर वाड्यात’ क्रांतिकारक तात्या टोपे यांनी केला होता मुक्काम

अमरावती जिल्ह्यातील लोणी येथील पाजणकर वाड्यात क्रांतिकारक तात्या टोपे यांनी एक रात्र मुक्काम केल्याचा ऐतिहासिक संदर्भ स्थानिक नोंदी व संशोधनातून समोर आला आहे.

अमरावती : 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक तात्या टोपे यांच्या हालचालींशी संबंधित अनेक ऐतिहासिक संदर्भ मध्य भारतात विखुरलेले आहेत. त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात लोणी गावाचाही उल्लेख काही ऐतिहासिक नोंदी, स्थानिक पुस्तकं आणि संशोधकांच्या अभ्यासातून पुढं येतो. इंग्रजांच्या पाठलागातून सुटका करत मेळघाट मार्गे झाशीच्या दिशेनं जात असताना तात्या टोपे यांनी लोणी येथील पाजणकर यांच्या भव्य वाड्यात एक रात्र मुक्काम केल्याची परंपरागत नोंद आणि स्थानिक इतिहास आजही जपला जात आहे.

पाजणकर वाड्याला लाभलं ऐतिहासिक महत्त्व : आज भग्नावस्थेत असणारा लोणी गावातील पाजणकर यांचा वाडा एकेकाळी परिसरातील प्रतिष्ठित आणि भव्य वास्तू म्हणून ओळखला जात होता. हा वाडा आज जीर्ण अवस्थेत असला तरी तात्या टोपे यांच्या मुक्कामामुळं या वास्तूला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणींचं काही स्थानिक पुस्तकांमध्येही या मुक्कामाचा उल्लेख आढळतो. त्यामुळं हा वाडा केवळ वास्तू न राहता स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी जोडलेला साक्षीदार मानला जातो.

 

पत्रव्यवहारातूनही आढळतो लोणीचा उल्लेख : मध्य प्रांतातील वऱ्हाड प्रदेशातील जरूर वरून परिसराशी संबंधित काही ऐतिहासिक संदर्भ स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब बेलसरे यांच्या जीवनावरील सामाजिक कार्यपुस्तकेत आढळतात. या पुस्तकात सामाजिक कार्यकर्ते आणि क्रांतिकारक परशुराम दारोकार यांनी जवाहरलाल दर्डा यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे. हुतात्मा स्मारकं‌ उभारण्याबाबत लिहिलेल्या या पत्रात तात्या टोपे लोणी गावात येऊन गेल्याचा उल्लेख नोंदवल्याची माहिती वरुड तालुक्यातील ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करणारे डॉ. हितेश ढोरे यांनी ‘खरा संवाद’शी बोलताना दिली.

पुस्तकातील नोंदीमधून मिळते ऐतिहासिक गोष्टी : “तात्या टोपे यांनी ज्या वाड्यात मुक्काम केला होता, त्या पाजणकर वाड्याशी संबंधित असणारे केशवराव पाजणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातही तात्या टोपे यांच्या लोणी मुक्कामाचा उल्लेख आहे. यासह करंजकर लिखित अमरावतीचा इतिहास खंड क्रमांक दोन मध्ये 1 नोव्हेंबर 1858 रोजी तात्या टोपे वरुड परिसरात असल्याची माहिती इंग्रज अधिकाऱ्यांना मिळाल्याची नोंद आहे. त्यावेळी तात्या टोपे यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी पाच वेगवेगळ्या ठिकाणाहून सैन्य एकत्रित करून वरुडच्या दिशेनं‌ पाठवलं होतं. 30 नोव्हेंबर 1858 रोजी ब्रिगेडियर हिल याच्या आदेशानुसार कॅप्टन स्कॉट याला वरुडच्या दिशेनं पाठवण्यात आल्याचा उल्लेख ही अमरावती शहराचा इतिहास या ग्रंथात येतो,” अशी माहिती देखील डॉ. हितेश ढोरे यांनी दिली.

 

हितेश ढोरे यांचं संशोधन : वरुड तालुक्यातील ऐतिहासिक संदर्भात संशोधन करणारे शेंदुर्जना घाट येथील रहिवासी डॉ. हितेश ढोरे यांच्या माहितीनुसार, “स्वतंत्र सेनानी परशुराम दारोकार आणि स्वतः तात्या टोपे हे लोणी इथं आले होते या संदर्भात पत्र उपलब्ध आहेत. कॅप्टन स्कॉटनं या परिसरात अनेक गावांमध्ये दडपशाही केली. इंग्रजांच्या अत्याचारामुळं उद्खेड या गावातील अनेक जण शेंदुर्जना घाट इथं पळून आले आणि या ठिकाणी त्यांनी हळद आणि मिरच्यांची दलाली केली. अशा अनेकांचा आडनाव उद्खेळकर होतं. आता मात्र ते दलाल या नावानंच ओळखले जातात. हा संपूर्ण संदर्भ या परिसरात तात्या टोपे आले होते हे स्पष्ट करणारा आहे.”

तात्या टोपेंचा शेंदुर्जनाघाट मार्गे पुढील प्रवास : “भूमिगत अवस्थेत असताना तात्या टोपे लोणी इथं आले होते. त्या काळात स्थानिक सावकार पांडुरंग पाजनकर यांनी तात्या टोपे यांना 20 रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्यानंतर तात्या टोपे शेंदूरजना घाट परिसरात गेले. तिथं बेलसरे यांच्या घरी मुक्काम करून पुढं मुलताई मार्गे झाशीच्या दिशेनं त्यांनी प्रयाण केलं,” अशी माहिती प्रवीण पाजणकर आणि प्रा. प्रशांत पाजणकर यांनी ‘ईटीव्ही भारत’ शी बोलताना दिली. “तात्या टोपे हे लोणी आणि शेंदूरजना घाट परिसरात सुमारे तीन दिवस वास्तव्यास असल्याची माहिती ही संशोधनातून पुढं आली आहे,” असं डॉ. हितेश ढोरे यांनी सांगितलं.

स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जपणारा वाडा : “पूर्वी पाजणकर कुटुंब सावकारी व्यवसायामुळं परिसरात प्रसिद्ध होतं. त्यावेळी पाजणकर वाड्याचा मोठा दरारा होता. पुण्यातील शनिवार वाड्यासारखी पाजणकरांच्या वाड्याची प्रतिकृती होती, असं सांगितलं जातं. तात्या टोपे यांनी एक रात्र आमच्या वाड्यात मुक्काम केला होता,” अशी माहिती गंगाराम पाजणकर यांनी ‘खरा संवाद’शी बोलताना सांगितली.

वाड्याला लागली होती आग : “लोणी गावात अतिशय देखणा वाडा म्हणून प्रसिद्ध असणारा पाजणकरांच्या वाड्याला 1994 यावर्षी आग लागली. या आगीमुळं हा वाडा कोसळला. या वाड्याचे अवशेष आज देखील या ठिकाणी शिल्लक आहेत. विशेष म्हणजे वाड्याच्या काही भागात पाजणकर कुटुंबातील सदस्य राहतात,” असं प्रा. प्रशांत पाजणकर यांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.