महाराष्ट्र

विकासाच्या घोषणांना खड्ड्यांचा सवाल!

दहिगाव–अंजनगाव सुर्जी मार्गावरील दुरवस्था नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा; कायमस्वरूपी दुरुस्तीची तीव्र मागणी

-अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) : दहिगाव रेचा–गरजदरी–खिरपाणी या गावांना अंजनगाव सुर्जीशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग पावसाळ्याच्या तडाख्याने अक्षरशः विदीर्ण झाला असून, रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे प्रत्येक प्रवास हा धोक्याचा ठरत आहे. विकासाच्या आश्वासनांची चर्चा कागदावर होत असताना प्रत्यक्षात मात्र या मार्गावर खड्ड्यांचेच साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असते. शेतकरी शेतीमाल घेऊन बाजारपेठेकडे, विद्यार्थी शिक्षणासाठी, महिला दैनंदिन कामांसाठी, तर रुग्ण उपचारासाठी याच रस्त्याचा आधार घेतात. मात्र पावसामुळे खड्डे पाण्याखाली गेल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक बनला असून, घसरून अपघात होण्याची भीती कायम आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेकदा संबंधित विभागाकडे निवेदने देण्यात आली. विविध लोकशाही मार्गांनी पाठपुरावा करण्यात आला, मात्र त्यातून केवळ आश्वासनांपलीकडे काहीच घडले नसल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती होणे हीच काळाची गरज असल्याचे ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे.

पावसाळ्यात या मार्गाची अवस्था आणखी बिकट होत असून, रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच अत्यावश्यक सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाची वाहतूक विलंबाने होत असल्याने शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. वाहतुकीचा वेग मंदावल्यामुळे वेळ, इंधन आणि आर्थिक खर्चही वाढत आहे.

परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या मार्गाची संयुक्त पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, संपूर्ण रस्त्याची गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर नव्हे, तर त्यापूर्वीच प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.