ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरात तरुणांनी दाखविली एकजूट; जीव धोक्यात घालून साडीच्या मदतीनं नागरिकांची सुटका

अमळनेरमध्ये जीवाची पर्वा न करता बोरी नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांची साडीच्या साह्यानं सुटका करण्यात आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बोरी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडत शहरातील पैलाड परिसरात प्रवेश केल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अचानक आलेल्या पुरामुळे काही नागरिक घरातच अडकून पडले. परिस्थिती गंभीर होत असतानाच स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता बचावकार्य करून अनेकांची सुटका केली

बचावकार्याचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुराच्या वेगवान पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी दोन टोकांना साडी घट्ट बांधून मानवी साखळी तयार करण्यात आल्याचं दिसून येतं. या साडीचा आधार घेत कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी पुरात अडकलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना एकामागून एक सुरक्षित स्थळी पोहोचवलं. पाण्याचा वेग मोठा असतानाही बचाव पथकानं दाखवलेल्या धाडस आणि प्रसंगावधानाचं नागरिक कौतुक करत आहेत.

 

व्हिडिओमध्ये दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं – दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या काठावरील वस्त्यांमध्ये पाणी वेगानं घुसल्यानं अनेक कुटुंबांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही. काही जण घरांच्या आत अडकून पडले. तर काहींनी छतावर आणि उंच ठिकाणी आश्रय घेतला. परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वी स्थानिक कार्यकर्ते मदतीला धावून आले. त्यांनी बचाव पथकाची वाट न पाहता उपलब्ध साधनांचा वापर करून बचावकार्य सुरू केलं. व्हिडिओमध्ये दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. पुराच्या प्रचंड प्रवाहात साडीचा आधार घेत नागरिक एक-एक पाऊल पुढे टाकत सुरक्षितस्थळी जाताना दिसतात. बचावकार्य करणारे कार्यकर्ते स्वतः पाण्यात उभे राहून प्रत्येकाला आधार देत असल्याचेही व्हिडिओत स्पष्ट दिसते. या धाडसी प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

 

धाडसी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्याचं आवाहन- घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या कार्यकर्त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. संकटाच्या काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीला धावून आलेल्या या युवकांनी माणुसकीचं दर्शन घडवल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत संबंधित कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. अशा धाडसी नागरिकांचा गौरव व्हावा, अशीही मागणी होत आहे.

जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, पूरग्रस्त भागात विनाकारण जाणं टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावं, असे आवाहन करण्यात आलं आहे. अमळनेरमधील हा थरारक रेस्क्यू केवळ एका बचावकार्याची घटना नाही. तर संकटसमयी स्थानिक नागरिकांनी दाखवलेले धैर्य, एकजूट आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरत आहे. पुराच्या रौद्ररूपासमोर न डगमगता जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या कार्यकर्त्यांचे धाडस आज संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलं आहे.

सुमारे 105 मिमी पावसाची नोंद – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतेच दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः पारोळा, भडगाव, मुक्ताईनगर आणि अमळनेर तालुक्यांतून नुकसानाचे अहवाल प्राप्त झाले आहेत. नुकसानग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार मदत दिली जाईल, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.