क्राइमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धामोरी बस स्टँडनजीकचा ‘तो’ स्ट्रीट मर्डर वाहनाचा कट लागल्याने!

खुनाचा अखेर पर्दाफाश; नऊ दिवसांनंतर बेड्या, खोलापूर पोलिसांचे यश

अमरावती : भातकुली तालुक्यातील धामोरी बस थांब्यानजीक २९ जुलै रोजी रात्री घडलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणाचा खोलापूर पोलिसांनी नऊ दिवसांनंतर यशस्वी उलगडा केला आहे. वाठोडा शुक्लेश्वर येथील रहिवासी राहुल राजू रावेकर (३२) या तरुणाच्या पाठीत चाकू खुपसून करण्यात आलेल्या निघृण खुनाच्या प्रकरणात खोलापूर पोलिसांनी साहिल राहुल भगत (१९, रा. अशोक वाटिका, वडाळी) व पीयूष रंजित गायकवाड (१९, नवसारी, अमरावती) यांना ७ व ८ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून तिघांनी ही हत्या घडवून आणली, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे खोलापूरचे ठाणेदार डॉ. अनूप वाकडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

२९ जुलै रोजी रात्री धामोरी बस थांब्यानजीक राहुल रावेकर याचा मृतदेह पाठीत चाकू खुपसलेल्या स्थितीत आढळला होता. राहुल हा मिस्त्री काम करीत होता. तो अमरावती येथील लक्ष्मीनगर भागात भाड्याने राहत होता. काम संपवून तो अमरावतीकडे आपल्या दुचाकीने येत होता. तर तिन्ही आरोपी हे दर्यापुरातील एका गुन्हेगाराला भेटून अमरावतीकडे परतत होते. कुठलाही सुगावा नसताना अनूप वाकडे यांच्या टीम खोलापूरने हा ब्लाईड मर्डरचा यशस्वी उलगडा केला.

असा झाला उलगडा खोलापूर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी साहिलला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्याला भेटण्याकरीता आठ ते दहाजण आले होते. त्यातील काही जण रेकॉर्डवरील होते. त्यात पुढे दर्यापूर तालुक्यातील एका गुन्हेगाराला चौकशीसाठी आणल्यानंतर साहिल, पियुष व दर्शन हे आपल्याकडे आल्याचे त्याने सांगितले. त्यातून पुढे खोलापूर पोलिसांनी खुनाची उकल केली. साहिल व दर्शन हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

५५० मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण या तपासादरम्यान इंटरनेट व टेलिकॉम सव्र्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे सुमारे ५५० मोबाइल क्रमांकांचे विश्लेषण करण्यात आले. तसेच घटनास्थळ व परिसरातील ६१ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

पसार दर्शनचा शोध गुन्हा दाखल झाल्यानंतर खोलापूर पोलिसांनी अनेक संशयितांचे जबाब नोंदवले, मात्र घटनेचा कुणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने या स्ट्रीट ब्लाईड मर्डरची उकल करण्यास मर्यादा आल्या होत्या. दरम्यान कसून तपासाअंती ७ऑगस्ट रोजी साहिल भगत याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर अमरावती शहरातून दुसऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले. पोलीस कोठडीदरम्यान चौकशीत हत्येमागील खरे कारण आणि त्याचा प्रत्यक्ष सहभाग समोर येईल, अशी माहिती तपास यंत्रणेने दिली आहे

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.