महाराष्ट्र

विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली कथित कोट्यवधींचा गंडा; अनुदान, कर्ज अन् सरकारी नोकरीचे आमिष, मुख्य संशयित महिलेला अटक

-अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी विश्वकर्मा योजनेचे नाव पुढे करून महिलांना कर्ज, शासकीय अनुदान, अल्पदरात गृहोपयोगी वस्तू तसेच सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अंजनगाव सुर्जी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुख्य संशयित महिलेला अटक करण्यात आली असून, अनेक गावांतील महिलांकडून अशाच प्रकारच्या तक्रारी पुढे येत असल्याने या कथित आर्थिक जाळ्याचा व्याप अधिक मोठा असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणी सारिका श्रीकांत राऊत (रा. येवता, ता. अचलपूर, ह.मु. मिल कॉलनी, परतवाडा) हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ ऑगस्ट रोजी तब्बल २० ते २५ महिला अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात पोहोचल्याने या प्रकरणाची व्याप्ती अनेक गावांपर्यंत पोहोचल्याचे संकेत मिळाले आहेत.

फिर्यादी फुलवंती राजकुमार तोटे (रा. निमखेड बाजार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च महिन्यात विश्वकर्मा योजनेअंतर्गत सहा हजार रुपये भरल्यास वॉशिंग मशीन, शिलाई मशीनसह इतर वस्तू मिळतील आणि शासनाकडून १८ हजार रुपयांचे अनुदान मिळेल, असे सांगण्यात आले. सुरुवातीला काही महिलांना वस्तू मिळाल्याने अनेकांचा विश्वास बसला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, विविध कारणांनी फिर्यादीकडून सुमारे ९ लाख १२ हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर मुलीला सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत आणखी रक्कम मागण्यात आली. बचत गटातून कर्ज काढून ३ लाख रुपये दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. याशिवाय १४ कोरे धनादेश, बँक पासबुक आणि स्वाक्षरी केलेले कोरे अर्ज ताब्यात घेतल्याचाही गंभीर आरोप आहे.

दरम्यान, कविता प्रदीप अनोकार व स्नेहल आशिष काळपांडे यांनीही प्रत्येकी १ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे या कथित फसवणुकीतील एकूण व्यवहार कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.

फिर्यादीच्या तक्रारीवरून १ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी मुख्य संशयित महिलेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पोळ व पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन इंगळे पुढील तपास करीत आहेत. बँक व्यवहार, ऑनलाइन देवाणघेवाण, कागदपत्रे आणि इतर पुराव्यांची सखोल छाननी सुरू असून या कथित आर्थिक जाळ्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढविली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.