एनसीएमसी कार्डसाठी अडवणूक केल्यास वाहकांवर होणार कारवाई

अमरावती: एसटी महामंडळाच्या विविव सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एंसीएमसी कार्ड आता महत्त्वाचे ठरणार आहे. सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्डचा वापर अनिवार्य करण्यात आला असून प्रवाशांना कार्ड काढण्यासाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख प्रवाशांची नोंदणी झाली असून, त्यापैकी सुमारे चार लाख कार्ड अॅक्टिव्हेट करण्यात आले आहेत. मात्र, कार्ड काढण्यासाठी किंवा ते दाखविण्यासाठी वाहकांकडून प्रवाशांची अडवणूक अथवा टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा प्रकारांची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा एसटी प्रशासनाने दिला आहे.
तक्रार कुठे कराल…
एनसीएमसी कार्डच्या कारणावरून वाहकाने अडवणूक केल्यास प्रवाशांनी संबंधित आगार प्रमुख यांच्याकडे तक्रार करता येते. तक्रारीत बस क्रमांक, प्रवासाची तारीख व वेळ, मार्ग, वाहकाचे नाव/बिल्ला क्रमांक आणि नेमकी घटना नमूद केल्यास चौकशी करणे सोपे होईल.
सवलतीत प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य
ज्येष्ठ नागरिक, अमृत योजना आणि महिलांसह विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्डची व्यवस्था केली आहे. सवलतीच्या प्रवासाची नोंद, पडताळणी अधिक सुलभ व्हावी, प्रवाशांना डिजिटल सुविधा मिळावी, यासाठी कार्डचा वापर होत आहे.
१ सप्टेंबरपर्यंत एनसीएमसी कार्ड काढण्याची अंतिम मुदत कार्ड काढण्यासाठी प्रवाशांना आणखी वेळ मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप कार्ड काढलेले नाही, त्यांनी मुदतीपूर्वी नोंदणी करून कार्ड अॅक्टिव्हेट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेल्या मुदतीत एनसीएम कार्ड काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
साडेसहा लाख नोंदणी, चार लाख कार्ड अॅक्टिव्ह…
जिल्ह्यात एनसीएमसी कार्डसाठी आतापर्यंत साडेसहा लाख प्रवाशांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी सुमारे चार लाख कार्ड अॅक्टिव्ह करण्यात आली आहेत.
कुठे काढायचे कार्ड ?
एसटीच्या संबंधित आगारात किंवा अधिकृत केंद्रावर जावे. आवश्यक कागदपत्रे व सवलतीसाठी पात्रतेचा पुरावा सादर करावा. प्रवाशाची नोंदणी केल्यानंतर एनसीएमसी कार्डची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई प्रवाशांना कार्ड काढण्यापासून परावृत्त करणे, चुकीची माहिती देणे, अनावश्यक अडवणूक कर्मचाऱ्यांना महागात पडणार आहे.
टाळाटाळीच्या तक्रारी…
एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी प्रवाशांना माहिती देण्याऐवजी काही ठिकाणी वाहकांकडून टाळाटाळ केली जात आहे.

