महत्वाचे

मेळघाटात १५० कोटींचे इको टुरिझम प्रकल्प — स्काय वॉकचे काम लवकरच सुरू होणार : पालकमंत्री बावनकुळे

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) चिखलदरा :
मेळघाट परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा इको टुरिझम प्रकल्प उभारण्यात येणार असून, स्काय वॉकचे कामसुद्धा लवकरच सुरू होणार आहे, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी केली.
ते शनिवारी आयोजित भारतीय जनता पक्षाच्या निवडणूकपूर्व पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, “केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना मेळघाटातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांनी घ्यावी. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. महायुतीमध्ये कोणासोबत युती करायची हे ठरवा, पण महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून यायला नको, याची काळजी घ्या.”

या मेळाव्यात आमदार केवलराम काळे, जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, यशवंत काळे, रूपेश चौबे, सुधीर रसे, तुषार खेरडे, सदाशिव खडके, साहेबराव काठोळे, आप्पा पाटील, साबुलाल दहीकर, हिरु हेकडे, बन्सी जामकर, क्षमा चौकशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“राणांच्या पराभवाचे शल्य कार्यकर्त्यांनी दूर करावे”

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या पराभवाचे शल्य अद्याप आहे. “प्रत्येक बूथवर दहा मते अधिक मिळाली असती, तर त्या निवडून आल्या असत्या. जे खासदार निवडून आले, ते आता गायब झाले आहेत,” असे म्हणत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना अधिक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

“काँग्रेसमध्ये एकजूट नाही”

काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कलहावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. नाना पटोले आणि वडेट्टीवार एकमेकांचे तोंड पाहत नाहीत. ते दोघे सपकाळ यांचे तोंड पाहत नाहीत, आणि तिघेही राहुल गांधींचे तोंड पाहत नाहीत. अशा पक्षात काही शिस्त उरलेली नाही.”

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.