क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

दुर्दैवी! लग्नाच्या दोन दिवस आधीच काळाचा घाला; अपघातात नवरदेवाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

 

भंडारा: घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच एका भीषण अपघाताने क्षणात आनंदाचे रूपांतर दुःखात केल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. लग्नाला अवघे दोन दिवस बाकी असताना नवरदेवाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्गेश किशोर लांजेवार (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण ठाणा पेट्रोलपंप परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी (पु.) जवळील कवडसी फाटा येथे गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्गेश लांजेवार हा ठाणा पेट्रोलपंप येथीलॉर्ड क्रमांक २, आंबेडकर वॉर्डाचा रहिवासी होता. तो काही कामानिमित्त कवडसी फाटा येथे गेला होता. रस्ता ओलांडत असताना भंडाराकडून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने (क्रमांक एम.एच. १४ एल. एक्स. ४२१९) त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुर्गेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

रविवारी वाजणार होते सनई-चौघडे येत्या रविवारी (ता. ११) दुर्गेशचा विवाह सोहळा पार पडणार होता. वधू आणि वर एकाच गावातील असल्याने दोन्ही कुटुंबात आणि गावात आनंदाचे वातावरण होते. घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, नियतीने वेगळाच डाव मांडला. ज्या घरात लग्नाची धामधूम होती, तिथेच आता आक्रोश ऐकू येत आहे. दुर्गेश हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता, त्यामुळे त्याच्या जाण्याने लांजेवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात अपघाताची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमाजी पाटील करत आहेत. शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दुर्गेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.