अंजनगाव सुर्जीमध्ये किरीट सोमय्या यांचा दौरा
बोगस जन्म दाखल्यांवर कारवाईची घोषणा; ५०० दाखले रद्द होणार

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
राज्यात बोगस जन्म दाखल्यांच्या धक्कादायक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होत असताना आज भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुर्जी येथे नियोजित दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नगरपरिषद, तहसील कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाशी सलग बैठका घेऊन बोगस दाखल्यांविरोधात ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले.
नगरपरिषदेत दीड तास चर्चा सोमय्या यांचे दुपारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात अंजनगाव सुर्जी येथे आगमन झाले. प्रथम त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटी दिल्या. दुपारी २.३० वाजता नगरपरिषदेत प्रवेश करून मुख्याधिकारी लोहकरे व इतर अधिकाऱ्यांशी त्यांनी तब्बल दीड तास चर्चा केली. यावेळी नगरपरिषदेतील नोंदी व दाखल्यांमधील संशयास्पद प्रकरणांवर माहितीची देवाणघेवाण झाली.
तहसील व पोलीस प्रशासनाशीही संवाद यानंतर तहसील कार्यालयात तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासोबत सुमारे १५ मिनिटांची बैठक घेण्यात आली. तत्पश्चात सोमय्या यांनी पोलीस स्टेशन गाठले व ठाणेदार सुरज बोंडे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी ठाकरे यांच्यासोबत बोगस दाखल्यांवर कारवाईबाबत सविस्तर चर्चा केली.
पत्रकार परिषदेत गंभीर खुलासे पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले,“अमरावती जिल्ह्यातील दोन मुख्याध्यापकांवर बोगस जन्म दाखले दिल्याप्रकरणी आधीच गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर अंजनगाव सुर्जी येथील दोन मुख्याध्यापकांवर देखील कारवाई होणार आहे. आतापर्यंत १०० हून अधिक बोगस दाखल्यांचा तपास लागला असून आम्ही अधिकाऱ्यांना आणखी १३९ बोगस दाखल्यांची यादी सुपूर्द केली आहे. जवळपास ५०० नागरिकांचे बोगस जन्म दाखले रद्द करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.”
भाजप पदाधिकारी उपस्थित सोमय्या यांच्या दौऱ्यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार रमेश बुंदिले, सुधीर गोळे, विक्रम पाठक, मनीष मेन तसेच महिला आघाडीच्या नेत्या नीता बोचरे यांचा विशेष सहभाग होता.

