अमरावती:नेर तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याच्या चार बकऱ्यांचा मृत्यू
50,000 रुपयांचे नुकसान

नेर : नेर तालुक्यातील येथील शेंद्री खु. गावातील शेतशिवारात आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसादरम्यान अचानक वीज कोसळल्याने शेतकरी उमेश दिलीप पवार यांच्या चार बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे अंदाजे 50,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीसोबतच बकरीपालन हा उमेश पवार यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार होता.
या नुकसानीमुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुपारच्या सुमारास शेंद्री खु. परिसरात जोरदार वारा आणि पावसाला सुरुवात झाली. उमेश पवार आपल्या बकऱ्या घरी घेऊन येत असताना अचानक वीज कोसळली.
या दुर्घटनेत त्यांच्या चार बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. उमेश पवार यांनी शेतीला जोडधंदा म्हणून बकरीपालन सुरू केले होते. मात्र बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच, घटनेची माहिती मिळताच शेंद्री आणि शहापूर येथील सरपंच शितल राठोड, उपसरपंच सचिन गणवीर, पोलीस पाटील रमेश पवार आणि शंकर राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली.
त्यांनी शेतकऱ्याला धीर देऊन शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तर उमेश पवार यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. “मी शेतीसोबत बकरीपालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. या नुकसानीमुळे माझ्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी केली आहे.

