महाराष्ट्र

समुपदेशनातून पारदर्शक बदल्या; जिल्हा परिषद अमरावतीत बदली प्रक्रियेला वेग

जिल्हा प्रतिनिधी अमरावती : जिल्हा परिषद अमरावती येथे सन २०२६ च्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी औपचारिक सुरुवात झाली. शासनाच्या निर्देशांनुसार समुपदेशन पद्धतीने ही प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दिवसभर बदली प्रक्रिया राबविण्यात आली.

पहिल्याच दिवशी महिला व बालविकास, पशुसंवर्धन, वित्त व लेखा तसेच आरोग्य विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यांना उपलब्ध रिक्त पदांचे पर्याय समुपदेशनाद्वारे देण्यात आल्याने प्रक्रिया अधिक सुसूत्र, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या काही विनंती बदल्यांना मंजुरी देण्यात आली. पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक पदांवरील प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांची अंमलबजावणी करण्यात आली. वित्त व लेखा विभागात कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक लेखा पदांवरील प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदल्यांची प्रक्रिया पार पडली. आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक (पुरुष) तसेच आरोग्य सेवक (पुरुष) पदांवरील मोठ्या प्रमाणातील बदल्या करण्यात आल्या.

दरम्यान, कृषी विभागातील काही प्रकरणांमध्ये आवश्यक मान्यता अथवा नकार प्राप्त झाल्याने त्या विभागातील बदली प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवारी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या प्रक्रियेदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे तसेच जिल्हा कृषी अधिकारी मल्ला तोडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बदली प्रक्रियेचे नियोजन आणि अंमलबजावणी प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.