महसूल शिबिराचा बोजवारा; नियोजनशून्यतेने उघड केला प्रशासनाचा चेहरा, नागरिकांचा संताप उफाळला
-प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी : नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने मोठ्या अपेक्षांसह आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज” महसूल समाधान शिबिर प्रत्यक्षात मात्र अव्यवस्थेचे प्रतीक ठरले. गाजावाजा, घोषणा आणि दाव्यांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामगिरीत प्रशासन अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसून आले, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. ८ मे २०२६ रोजी दयापूर रोडवरील सिताबाई संगई हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी स्थळ निवडीतच मोठी त्रुटी झाल्याची चर्चा आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांऐवजी तुलनेने दुर्गम आणि अपुऱ्या सुविधांच्या जागेची निवड केल्यामुळे अनेक नागरिकांना ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागले. आधीच कडक उन्हाळ्याचे चटके असताना टीनाच्या पत्र्याखालील सभागृहात कार्यक्रम घेतल्याने उपस्थितांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला.
प्रशासनाकडून व्यापक जनजागृती झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर माहितीच लोकांपर्यंत पोहोचली नसल्याचे चित्र दिसले. परिणामी शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिसाद अत्यल्प राहिला. रिकाम्या खुर्च्यांनीच या शिबिराच्या अपयशाची साक्ष दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमस्थळी मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. बसण्याची अपुरी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता, तसेच उष्णतेपासून संरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने उपस्थित नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काहींना उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागल्याने प्रशासनाच्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले आमदार गजानन लवटे यांनी परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित उपक्रमांमध्ये केवळ औपचारिकता नको, तर प्रत्यक्ष परिणाम दिसणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. माहितीचा अभाव, अपुरी सुविधा आणि नियोजनातील त्रुटी यामुळे अशा शिबिरांचा उद्देशच धोक्यात येतो, असेही त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष अविनाश गायगोले, तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असले तरी, एकंदर व्यवस्थापनातील कमतरता लपून राहू शकली नाही. या घटनेनंतर शहरात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू झाली असून भविष्यात अशा उपक्रमांचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
नागरिकांच्या प्रश्नांना दिलासा देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम हे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात परिणामकारक ठरणे आवश्यक आहे. अन्यथा अशा उपक्रमांमुळे अपेक्षाभंग होऊन प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

