मेळघाटातील जांभूळ अतिशय चवदार आणि आरोग्यदायी; आदिवासी बांधवांच्या अर्थकारणातही आहे वाटा
जूनमध्ये पावसाची वाट पाहत असताना, सर्वांना आवडणारी रानफळे बाजारात विकायला येतात. आता मेळघाटच्या जंगलातून जांभूळ तोडून विकणाऱ्या आदिवासी बांधवांना यातून चांगला रोजगार मिळत आहे.

अमरावती :आता आंब्यांचा मोसम शेवटच्या टप्यात असताना जीभ, तोंड जांभळं करणारी बाजारात आलेल्या जांभळाची चव सध्या मोठ्या प्रमाणात चाखली जातेय. मेळघाटच्या जंगलात मोठ्या संख्येनं असणाऱ्या जांभूळ वनातील जांभूळ खाण्यासाठी पर्यटक येत आहेत. विशेष म्हणजे मेळघाटात मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस आणि जांभूळ चाखण्याची आगळीवेगळी मजा आहे. अतिशय चवदार आणि आरोग्यदायी असणाऱ्या या जांभूळचा मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या अर्थकारणात देखील महत्त्वाचा वाटा आहे.
जंगलात जाऊन गोळा करतात जांभूळ : मेळघाटात जवळपास सर्वच गावालगत असणाऱ्या जंगल परिसरात जांभळाची झाडे आहेत. आदिवासी बांधव सकाळी दिवस उजाडताच जंगलातील झाडावर चढून जांभळे तोडतात तर अनेकदा झाडाखाली पडलेला जांभळाचा सडा वेचून आणतात. पर्यटन स्थळ असणाऱ्या चिखलदरा येथे येणारे पर्यटक या जंगलातील जांभूळ मोठ्या चवीनं खातात. चिखलदरा मार्गावर असणाऱ्या मोथा येथे देखील घोडेस्वारी, बाईक रायडिंगसाठी पर्यटकांची गर्दी असते. याठिकाणी देखील रस्त्यावर जांभूळ विक्रीसाठी बसणाऱ्या आदिवासी कुटुंबाला दिवसभरत हजार बाराशे रुपये मिळतात. बाटा प्रमाणात आम्ही जांभूळ विकतो एक बाटा तीस रुपयाला विकला जातो. (दोन ओंजळ म्हणजे एक बाटा) दिवसभरात शंभर ते दोनशे बाटे जांभूळ आम्ही विकतो असं जांभूळ विक्रेते रवी कासदेकर यांनी सांगितलं.
हजार रुपये कॅरेटनं जांभूळ विक्री :मेळघाटातील जांभळला शहरी भागात मोठी मागणी आहे. परतवाडासह अकोला, अकोट आणि लगतच्या मध्यप्रदेशातील बैतूल, भैसदेही या शहरात देखील चिखलदरा येथून व्यापारी जांभूळ खरेदी करतात. जांभळचा एक कॅरेट एक हजार रुपये दराने विकला जातो.

जांभळाच्या ज्यूसला मागणी : खादी ग्राम उद्योग विभागाच्यावतीनं चिखलदरा येथे स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून जांभळाचा ज्यूस काढला जातो. याठिकाणी चिखलदरा, खटकाली, आमझरी, मरियमपूर या गावातील शंभर महिला आणि पुरुष जंगलातील जांभूळ तोडून आणतात. जांभळाच्या बिया आणि मागज वेगळा केल्यावर मागजामधून रस काढला जातो. एकूण १ लिटर जांभळाचा ज्यूस हा ५०० रुपयात विकला जातो. ज्यूससाठी जंगलातून जांभूळ आणणाऱ्या महिलांना तीन महिने चांगला रोजगार मिळतो अशी माहिती स्फूर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांनी ‘ईटीव्ही भारत’ शी बोलताना दिली. मे, जून आणि जुलै महिन्यात जांभळं चाखायला मिळतात. मात्र, जांभळाचा ज्यूस हा वर्षभर उपलब्ध असतो आणि या ज्यूसला अमरावती शहरासोबतच नागपूर, अकोला, यवतमाळ, मुंबई आणि पुण्यात देखील मोठी मागणी असल्याची माहिती सुनील भालेराव यांनी दिली.

जांभळामध्ये औषधी गुणधर्म: ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी जांभूळ हे फळ आरोग्यदायी औषध आहे. जांभूळमध्ये असणारा जॅबोलीन नावाचा घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करत असल्यानं डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे जांभूळ खाणं उत्तम आहे. पचनशक्ती वाढविण्यासाठी जांभूळ उपयुक्त आहे. रक्त शुद्धीकरण करणं त्वचेचे विकार दूर करणे, हृदयाच्या आरोग्यासाठी जांभूळ खाणं लाभदायक आहे. जांभूळ खाल्ल्यानं कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जांभूळ खाल्ल्यानं मदत होते. मुखशुद्धीसाठीही जांभूळ खायला हवेत असं चिखलदरा येथील डॉ. विजय जयस्वाल यांनी सांगितलं.


