ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल- सुषमा अंधारे

पुणे : हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा एकच मोर्चा निघणार आहे. “आमचे नेते बाळासाहेब ठाकरे असून त्यांनी सांगितलेल्या विषयी मोर्चाच्या निमित्तानं का होईना पण दोन नेते एकत्र येणं म्हणजे बाळासाहेबांच्या स्वप्नातील पहिला अध्याय मुहूर्त स्वरूप घेत आहे, असं म्हणावं लागेल” अशी प्रतिक्रिया हिंदी सक्तीविरोधात होणाऱ्या मोर्चाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.
महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित आमच्यासाठी महत्वाचं : पुण्यात शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या “महाराष्ट्रातील मराठी माणसाचं हितं लक्षात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष काम करत आहे. मागील अनेक दिवसांपासून आम्हाला याबाबत विचारलं जात होत. त्यावेळी आम्ही सांगत होतो की, महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र याची एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे. जर मराठीसाठी लढणारे दोन नेते हे एकत्र येत असतील तर, ती देखील एकजूट या निमित्तानं महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. मराठीसाठी जो मोर्चा निघणार आहे, तो दोन्ही पक्ष मोर्चा एकत्र काढणार आहेत. हे ठरल्यावर शुक्रवार सकाळपासून भाजपाकडून विधानांचा पूर येत आहे.”
भाजपाच्या विधानांना उत्तर देण्यासाठी वेळ नाही : “ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित झाल्यावर भाजपाचे नेते वेगवेगळी विधानं करत आहेत. त्याला उत्तर द्यायला वेळ नाही. मात्र एक नक्की आहे की जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे प्रमुख भेटतात, तेव्हा भाजपाला चांगलं वाटतं. पण जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत मनसे मोर्चा काढते, त्यावेळेस भाजपाकडून अनेक अर्थ काढण्यात येतात. हे जे दोन पक्षाचं मनोमिलन भाजपाला अजिबात पचलेलं नाही. त्यामुळं भाजपाच्या नेत्यांची सकाळपासून वेगवेगळी विधाने येत आहेत,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपावर टीका केली.
आमदार-खासदार यांच्याही अडचणी असू शकतात : “शरद पवार यांना भूमिका मांडताना काही अडचणी असतील. केंद्र तसंच इतर राज्यातील आमदार-खासदार यांच्या काही अडचणी असू शकतात,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी दिली.

