रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा… अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर!
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.

मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नावरुन विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. तर विधानसभेत केवळ 26 मिनिटांचं कामकाज चाललं. त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. या कामकाजात चार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले आणि शोक प्रस्ताव मांडण्यात आला. तर दुसरीकडं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.
निव्वळ भार 40 हजार 644 कोटी 69 लाख रुपयांचा… : अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक 11 हजार 42 कोटी 76 लाख रुपये हे 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत. तर एकूण पुरवण्या मागण्यांपैकी 19 हजार 183 कोटी 85 लाख रुपये अनिवार्य आहे. तर 3 हजार 664 कोटी 52 लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. तसंच 34 हजार 661 कोटी 34 लाख रुपये विविध कार्यक्रमांतर्गत खर्च होणार आहे. दरम्यान, एकूण पुरवणी मागण्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या असल्या तरी याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40 हजार 644 कोटी 69 लाख रुपयांचा असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. याचबरोबर, नगर विकास विभागासाठी सर्वाधिक निधी म्हणजे 15465,13 कोटी देण्यात आला आहे. तर सर्वाजनिक बांधकाम विभागासाठी 9068,49 कोटी देण्यात आले आहेत. तर ग्रामविकास विभागासाठी 4733,11 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
कोणत्या योजनांसाठी निधी? : दरम्यान, हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल, वंचित समाज घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

