टेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

हैदराबादच्या सालारजंग कुटुंबीयांनी खासदार भुमरेंच्या चालकाला दीडशे कोटींची जमीन भेट दिल्यानं वाद, नेमकं प्रकरण काय?

शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांच्या चालकाला हैदराबादच्या सालारजंग कुटुंबानं जमीन भेट दिल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीला आता सुरुवात झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाकडून हिबानामा म्हणजे भेटवस्तू म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील मोक्याची तीन एकर जमीन खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला दिल्याची तक्रार परभणीतील वकील मुजाहिद खान यांनी केलीय. सोन्याच्या भावाची जमीन भुमरे कुटुंबीयांच्या ड्रायव्हरला कशी दिली हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. मुजाहिद खान यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर सालारजंग यांचे मुख्तियार धारक शिवकुमार चव्हाण यांनी संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

दान दिलेली जमीन वादात : छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील दाऊदपुरा इथली जमीन वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्या नावावर सालारजंग यांच्या वंशजांनी जमीन भेट केलीय. त्यानंतर अचानक अशी कोट्यवधींची जमीन नेत्याच्या चालकाला भेट म्हणून कशी देऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित झालाय. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ड्रायव्हर जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलावलंय. त्याच्या प्राप्तिकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर दिलेली भेट कोणत्या आधारावर केली आहे, याची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे त्या गिफ्ट डिडवर ड्रायव्हरनं स्वाक्षरी कशी केली हे स्पष्ट करण्यास सांगितलंय. सालारजंग यांचे वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची आता चौकशी केली जात आहे.

जमीन विकत घेतल्याचा वकिलाचा दावा : परभणी इथले अॅड. मुजाहिद खान यांनी सदर जमीन विकत घेतल्याचा दावा केला आहे. सालारजंग यांचे वंशज माझ्याकडं आले होते. “आमची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळं कायदेशीर कारवाईसाठी तुम्हीच पैसे खर्च करा आणि जमीन तुमच्या नावावर करून घ्या, असं त्यांनी मला सांगितलं. कोरोनापूर्वी हा व्यवहार झाला होता. मी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो. त्यावेळी सदर प्रकार लक्षात आल्यावर पोलिसात तक्रार दिली,” असं अॅड. मुजाहिद खान यांनी सांगितलं.

सालारजंग यांच्याशी कौटुंबिक नाते : “माझ्या वडिलांचे आणि हैदराबादचे सालारजंग यांचे जुने कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळं मला ही जमीन भेट दिली आहे. त्यात खासदार संदिपान भुमरे किंवा आमदार विलास भुमरे यांचा काही संबंध नाही. माझी चौकशी झाली आहे. माझ्या जवळचे सगळे दस्तावेज मी तपासासाठी दिले आहेत. त्यामुळं जे आरोप होत आहेत, ते चुकीचं आहेत. माझ्या वडिलांचे चांगले संबंध असल्याने सालारजंग आमच्याकडं यायचे,” असं ड्रायव्हर जावेद शेख यानं सांगितलं. सोमवारी जावेद शेख याची पोलिसांनी सहा ते सात तास चौकशी केलीय.

 

कायदेशीर कारवाई करणार : सालारजंग मालमत्ता जीपीए धारक (मुख्तियार धारक) शिवकुमार चव्हाण यांनी या प्रकरणी संबंधित सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय. “2018 मध्ये जिंसी पोलिसांत एक तक्रार दाखल झाली. त्यामध्ये मीर अली खान यांचे पूर्वज सालारजंग यांच्याकडं कामाला होते. त्यामुळं ते मालक होऊ शकत नाहीत. शहरातील वेगवेगळ्या जागा आहेत. 1961 मध्ये सालारजंग यांच्या सर्व जागांचा पंचनामा करण्यात आला होता. आमच्याकडील सर्व दस्तावेज जिल्हाधिकारी यांच्याकडं पूर्वीच दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी ही प्रकरण आम्हाला कळालं. आता जमीन देणारा, घेणारा आणि मध्यस्थी वकील यांच्यासह संबंधित सर्व लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे,” असं सालारजंग मालमत्ता जीपीए धारक (मुख्तियार धारक) शिवकुमार चव्हाण यांनी सांगितलं.

आमचा संबंध नाही : “सदर प्रकरणाशी आमचा संबंध नाही. जावेद रसूल शेख आमच्याकडं चालक आहेत. मात्र त्याच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंध नाही. रोज सकाळी यायचं, गाडी स्वच्छ करायची, आम्हाला दिवसभर जिकडे जायचे तिकडे घेऊन जाणे आणि सायंकाळी काम झालं की परत आणणं हे त्याचं काम आहे. तो घरी काय करतो?, त्याला कोण काय देतं? हे आम्हाला माहीत नाही. त्याच्याशी आमचा संबंध येत नाही. लोकप्रतिनिधी असल्यामुळं अनेक जण आम्हाला भेटायला येतात. त्यावेळी ते फोटो काढतात. त्यापैकी काही गुन्हेगार असतात. तर आम्ही थोडी त्यांना काही करायला सांगतो. हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत आमचा काही संबंध नाही,” असं स्पष्टीकरण आमदार विलास भुमरे यांनी दिले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.