ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

संजय राऊत यांचं ‘ते’ ट्विट… बेडरूममधील व्हिडिओवरून संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपली!

मुंबई : आयकर विभागाच्या नोटीसमुळं चर्चेत आलेले मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करणारं एक ट्विट केलं असून, यामध्ये एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसल्याचं दिसून येतंय. तसंच संजय शिरसाट यांच्या हातात सिगारेट देखील असून, ते कोणाशीतरी फोनवर बोलतायेत. याशिवाय, संजय शिरसाट ज्या पलंगावर बसलेत. त्या पलंगाखाली एक मोठी बॅग असून, या बॅगेत पैसे असल्याचं दिसून येतंय. दरम्यान, या व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसंच यावरून ठाकरे गटानं टीकेच्या फेरी झाडण्यास सुरुवात केलीय. तर या टीकेला संजय शिरसाट यांनी देखिल उत्तर दिलंय.

नोटीस आली, तरी ऐटीत फिरतायेत : याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, “33 देशांनी नोंद घेतली. त्यावेळी जे खोके घेतले, त्यातील एक खोका आता दिसला असेल. चड्डी बनियान कंपनीनं देखील यात जाहिरात केलीय. मुख्यमंत्र्यांनी यावर चौकशी देखील लावलीय. भ्रष्टनाथ शिंदेंवर कारवाई करणार का? असा आमचा प्रश्न आहे. पण मी सांगतो ते कारवाई करणार नाहीत. या प्रकरणात आयटी आता काय कारवाई करते, हे बघावं लागेल. काल आयटीची नोटीस आली, तरी ऐटीत फिरतायेत. यावरूनच आपल्याला अंदाज आला असेल. मुख्यमंत्र्यांना खरंच कारवाई करायची असेल तर ते हा व्हिडिओ पाहून कारवाई करतील. यांचे संजय गायकवाड आणि आता संजय शिरसाट हे संजय बनियानची जाहिरात करायला लागलेत का? असा प्रश्न पडतो, ” अशी खोचक प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय.

महाराष्ट्रमध्ये चाललंय काय? : यावरून आमदार भास्कर जाधव यांनीही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “संजय शिरसाट म्हणत आहेत. त्या बॅगेत कपडे आहेत. पण ही बॅग त्यांच्याच बेडरूममध्ये आहे आणि त्या बॅगेत सरळ सरळ पैसे दिसतायेत. ही बॅग कोणत्या तरी शिक्षण संस्थेला किंवा कोणत्या तरी चांगल्या कामाला दानधर्म करून पुण्य मिळवावं. महाराष्ट्रमध्ये चाललंय काय? जनतेनं या सरकारला निवडून दिलेलं आहे. एक आमदार वाटेल तेवढ्या शिव्या देतो. एक आमदार टॉवेलवर बसून आहे. एक आमदार मारामारी करतो. ही मस्ती सत्तेतून आलीय,” असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय.

 

मूर्ख माणसासाठी वेळ वाया घालवू नका : दरम्यान, संजय राऊत यांच्या ट्विटमधील व्हिडिओ आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर संजय शिरसाट यांनी देखील भाष्य केलंय. ते म्हणाले की, “संजय राऊत यांनी आजही ठरल्या प्रमाणे भुंकण्याचं काम केलंय. एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी, अमित शाहांना भेटले की त्यांना लगेच संताजी धनाजी दिसतात. या मूर्ख माणसासाठी वेळ वाया घालवू नका. व्हिडीओ काय दाखवत आहात. माझं घरं आहे, माझी खोली आहे. बनियनवर मी आहे. माझा कुत्रा तिथं आहे. याचा अर्थ असा होतो की, मी प्रवासातून आलो आहे. इतकी मोठी बॅग पैशांची असती तर ती मी कपाटात ठेवली असती. यांना पैशांव्यतिरिक्त काहीही दिसत नाही. यांना पैसे ठेवायला बॅग लागतात, असं यांचं वर्तन आहे,” असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.

राजकारण आमचा धंदा नाही : पुढं संजय शिरसाट यांनी सांगितलं की, “माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग मी ठेवली आहे. अशा बातम्या करायला यांना सुचत कसं? आमच्या कडे मातोश्री 2 नाही. माझ्या मतदारसंघात सगळ्यांना माझ्या घरात येण्याची परवानगी आहे. माझ्याकडे चिठ्ठी देऊन आत घेतलं जातं नाही. आम्ही स्वतः कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्यांसाठी आम्ही आहोत. नेता म्हणून नाही तर कार्यकर्ते म्हणून राहा…ही बाळासाहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. कोणी व्हिडीओ काढला तर त्यात गैर काही नाही. जाणूनबुजून आम्हाला टार्गेट केलं जातंय. त्या व्हिडीओमध्ये काही तथ्य नाही. आधी आडवी बॅग नंतर उभी बॅग दाखवत आहेत. मी पुन्हा सांगतो, त्या बॅगेत कपडे होते. राजकारण आमचा धंदा नाही,” असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.