लोकल रेल्वेतील स्फोटाच्या आठवणी 19 वर्षांनंतरही मुंबईकरांच्या स्मरणात, कसा झाला होता बॉम्बस्फोट?
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. हा बॉम्बस्फोट कसा झाला होता, वाचा सविस्तर

मुंबई- 7/11 म्हणजे 11 जुलै 2006 रोजीच्या बॉम्बस्फोट प्रकरणामधील सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली आहे. 19 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यावेळी काय घडलं होतं? हे, जाणून घ्या.
11 जुलै 2006 रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईसह देश हादरवून गेला होता. या प्रकरणाचा 31 जानेवारी 2025 रोजी राखीव ठेवलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयानं आज जाहीर केला. 2015 मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली.
इंडियन मुजाहिदीनवर आहे आरोप- 11 जुलै 2006 च्या संध्याकाळी, पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) उपनगरीय गाड्यांमधून लाखो प्रवासी त्यांच्या घरी जाण्यासाठी धावत असताना ऐन गर्दीच्या वेळी सुमारे संध्याकाळी 6 वाजून 24 वाजता स्फोट झाला. सात लोकल रेल्वेमधील प्रथम श्रेणीतील पुरुषांच्या डब्यांमध्ये ‘प्रेशर कुकर बॉम्ब’नं स्फोट घडवून आण्यात आले. गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सरकारच्या अहवालांनुसार, 11 जुलै २००६ रोजी झालेले साखळी बॉम्बस्फोट आयएमने (इंडियन मुजाहिदन) घडवून आणले होते. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये सात आरडीएक्स बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 829 जण जखमी झाले होते.
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा झाली होती ठप्प० माटुंगा (दक्षिण मुंबई) आणि भाईंदर (ठाणे) स्थानकांदरम्यानच्या अनेक स्थानकांवर स्फोट झाल्यानं अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झालं. घाबरलेल्या प्रवाशांमध्ये रेल्वे आणि रेल्वे स्टेशनमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. अचानक झालेल्या बॉम्बस्फोटामुळे रेल्वेचे अधिकारीही गोंधळून गेले. अनेक स्फोट झाल्यामुळे पश्चिम रेल्वे ठप्प झाले होते. लाखो प्रवासी रेल्वे सोडून रस्त्यावर आल्यानं मुख्य रस्ते, महामार्ग, मुख्य रस्ते आणि अगदी स्थानिक रस्त्यांवर अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या दुर्घटनेला तोंड देताना अनेक जणांनी मदतीचे हात दिले. हजारो मुंबईकरांनी ‘मुंबईचे स्पिरीट’ दाखवित घरी जाणाऱ्या प्रवाशांना छत्री, रेनकोट, प्लास्टिकच्या चादरी, चहा-कॉफी आणि बिस्किटे देऊन आधार दिला.
1993 नंतर प्रथमच आरडीएक्सचा वापर- तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी हल्ल्याची माहिती मिळाली होती, याची कबुली दिली होती. मात्र, हल्ल्याची वेळ किंवा ठिकाण माहिती नव्हते, असे स्पष्ट केले. बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांनी 350 हून अधिक संशयितांना अटक केली. प्राथमिक तपासानुसार ‘प्रेशर कुकर बॉम्ब’मध्ये आरडीएक्स, अमोनियम नायट्रेटचे घातक मिश्रण होता. मार्च 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर प्रथमच मुंबईतील स्फोटात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता.
कोणत्या आरोपींना सुनावली होती शिक्षा?- सप्टेंबर 2015 मध्ये, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या विशेष न्यायालयानं (मकोका 12 जणांना दोषी ठरविलं. फैसल शेख, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी आणि आसिफ खान यांना उपनगरीय गाड्यांमध्ये 7 ‘प्रेशर कुकर’ ठेवल्याबद्दल फाशीची शिक्षणा ठोठावली. तर डॉ. तन्वीर अन्सारी, एम. साजिद अन्सारी, मोहम्मद अली, मुझम्मिल शेख, माजिद शफी, सोहेल शेख आणि झमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 11 मिनिटांच्या स्फोटाच्या आठवणी 19 वर्षानंतरही मुंबईकरांना आजही आठवतात.

