वाघडोह ग्रामपंचायत द्वितीय पुरस्काराने सन्मानित
पुरस्कारासह जिल्हा नियोजन समितीतून मिळणार दहा लाखांचा निधी

परतवाडा : प्रतिनिधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत वाघडोह ग्रामपंचायतला चार लाख रुपयांच्या द्वितीय पुरस्काराने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच व सचिव यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर जिल्हा नियोजन समितीतून वाघडोह ग्रामपंचायतला दहा लाखांचा निधी देण्याची घोषणासुद्धा यावेळी पालकमंत्र्यांकडून करण्यात आली.
वाघडोहच्या महिला सरपंच भाग्यश्री संतोष लंगोटे यांनी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम तथा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत मोलाचे कार्य केले. त्यामुळे जानेवारी २०२५ ला वाघडोह ग्रामपंचायतची स्मार्ट ग्रामच्या प्रथम पुरस्कारासाठी, तर जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कारासाठी निवड’ करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १९ जुलै २०२५ ला झालेल्या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश देऊन सरपंच भाग्यश्री लंगोटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुरेखा घाटे, सचिव नीलेश इंगळे, सदस्य सरस्वती आठवले, तेजस सोनोने, कमलदास शेलेकर, बजरंग जामकर, शंकर मदने, ऊर्मिला पाटील, सरिता गाठे, विनोद कारले, कोकिळा जाधव आणि अभिजित मांगूळकर, रतन पटोकार यांची उपस्थिती होती.
पुरस्कार निवडीची घोषणा झाल्यापासून गावात आनंदमय वातावरण तयार झाले होते. तर आता मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेने नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले आहे.
सर्व सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने हे शक्य झाले असून यापुढेही पूर्ण जबाबदारीने स्वच्छता अभियानाचे कार्य अविरत सुरू राहील. तर पुरस्कारांतर्गत मिळालेली चार लाख रुपयांची रक्कम व त्यासह जिल्हा नियोजन समितीतून १० लाखांचा अतिरिक्त निधी मिळणार असल्याची घोषणा ऐकून खूपच आनंद झाला आहे. पुरस्कारांतर्गत मिळणाऱ्या या सर्व निधीतून गावविकासाला प्राधान्य दिले जाईल.
– भाग्यश्री लंगोटे, सरपंच, वाघडोह.

