शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टी – राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली, बिंदू चौकात एकमेकांविरोधात ठोकले शड्डू
दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी राजेश क्षीरसागर यांना आव्हान देत निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलेल्या जमिनीपेक्षा जास्त असल्यास नावावर करण्याचं आव्हान दिलं होतं.

कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून शक्तिपीठ महामार्गावरुन शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडं 500 एकर जमीन असल्याचा राजेश क्षीरसागर यांनी आरोप केला होता. याला शनिवारी राजू शेट्टी यांनी बिंदू चौकात येऊन प्रत्युत्तर दिलं. कार्यकर्त्यांसोबत दोन तास ठिय्या मारूनही आमदार क्षीरसागर बिंदू चौकात फिरकले नाहीत. “आरोप सिद्ध करा अन्यथा तुमची सर्व मालमत्ता अंबाबाई देवीला दान करा,” असं आव्हान राजू शेट्टींनी दिलं. “तर निव्वळ स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध असणारे राजू शेट्टी कोरोना काळात कुठं होते?,” असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारलाय.
रात्री-अपरात्री कागदपत्र घेऊन जावा : कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात जमिनीचे सातबारे घेऊन राजू शेट्टी वकिलांसह दाखल झाले. यावेळी 500 एकर जमिनीचे पुरावे द्या. सगळ्या जमिनीचं बक्षीसपत्र तुमच्या नावावर करून देतो, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली. शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राजू शेट्टी कार्यकर्त्यासमवेत भर पावसात जवळपास 2 तास बिंदू चौकात ठाण मांडून होते. राजेश क्षीरसागर न आल्यानं कार्यकर्त्यांच्या साक्षीनं त्या बक्षिसपत्रावर सह्या करून सदर कागदपत्र रात्री-अपरात्री कधीही घेऊन जाण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना केलंय.
कोरोना, महापूर काळात ते कोणत्या बिळात लपले होते ? : “जिल्ह्यात काही चांगलं होत असेल तर त्यात खोड घालायची काही लोकांची प्रवृत्ती आहे. त्यामुळं दुधात पडलेला मिठाचा खडा शेतकरी बांधवांनीच बाजूला करून राजू शेट्टी यांना सलग दुसऱ्यांदा घरी बसवलं. दातृत्व काय असते हे मला राजू शेट्टी यांच्यासारख्या दलबदलू व्यक्तीकडून शिकण्याची गरज नाही. आई अंबाबाई चरणी मी माझं जीवन दान करेन. पण, निव्वळ स्टंटबाजीसाठी दातृत्वाची भाषा करणारे राजू शेट्टी कोरोना आणि महापूर काळात कोणत्या बिळात लपले होते, हे जनतेनं पाहिलं आहे. त्यामुळं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे,” असा खोचक टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.
नेत्यांच्या वादात शेतकरी वाऱ्यावर : शक्तिपीठ महामार्गामुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचं दुःख शासन दरबारी पोहोचवण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. तर फक्त मोबदला मिळतो म्हणून बागायती जमिनी शक्तिपीठ महामार्गासाठी देण्यात काही शेतकरी धन्यता मानत आहेत. मात्र, ऊसाचा उतारा सर्वाधिक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात बागायत शेतीच राहणार नसेल तर, शक्तिपीठ महामार्ग काय कामाचा? असा सवाल ही काही शेतकरी उपस्थित करत आहेत. एकीकडं जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत. यंदाची एफआरपी कारखानदारांनी शेतकऱ्यांना अदा केलेली नाही. तर जिल्ह्यातील ठेकेदार कामाचे पैसे मिळावेत म्हणून शासन दरबारी टाहो फोडत आहेत. मात्र नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यातच धन्यता मानत असतील तर, मायबाप म्हणून कोणाकडं दाद मागायची असा सवाल सामान्य कोल्हापूरकर विचारत आहेत.

