पातूर-अडगाव रस्त्यासाठी शाळेचे विद्यार्थी धडकले जि.प. वर
मागणी • बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण, दुरुस्तीचे सीईओंचे आदेश, रस्त्याच्या दुरवस्थेचाही विद्यार्थ्यांना मोठा फटका

अमरावती, मोर्शी तालुक्याच्या सीमेवरील अडगाव ते पातूर या एक किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पातूर येथून अडगावला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. ही बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्यालय गाठले. या समस्येची दखल घेत दोन्ही प्रमुख महिला अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रारंभी या जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीइओ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या
प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून घेत बांधकाम विभागाला तसे आदेश दिले. दरम्यानच्या काळात सीइओ संजीता महापात्र व्हीसी आटोपून त्यांच्या कक्षात आल्या होत्या. त्यामुळे विद्याथ्यर्थ्यांनी त्यांचीही भेट घेतली. अतिरिक्त सीइओ प्रिती देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती यावेळी त्यांना सांगीतली. सीइओ महापात्र यांना शाळा व शिक्षणाबद्दल विचारपूस करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेतली. सीइओंच्या निर्देशानुसार संबंधित रस्ता दुरुस्त करावयाचा आहे. यावेळी झालेल्या चर्चेनुसार पातूरच्या विद्यार्थ्यांना अडगाव येथील प्रगती विद्यालयात शिकायला जावे लागते. सायकल वा पायी असा त्यांचा प्रवास असतो. परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्यांना ते शक्य होत नाही.
विद्यार्थ्यांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडली कैफियत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी अबोली फरतोडे, प्रणिती पांडे, कृष्णा नागपुरे, शौर्य भोगे, श्रेया वानखडे, कस्तुरी फरतोडे, चैताली भोगे, नैतीक नागपुरे, नंदिनी भोगे, वंशिका भोगे, कावेरी गतफणे, आयुष फरतोडे, सार्थक फरतोडे, उन्नती पांडे, वेदिका नागपुरे, इश्वरी राणे, पृथ्वीराज पांडे आर्दीनी सहभाग नोंदवला.

