ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजपाचे नांदगाव मंडल अध्यक्ष संजय सानप यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात भाजपाचे नांदगाव मंडल अध्यक्ष संजय सानप यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आमच्या नेत्यांची सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत यांनी केला असून याबाबत आम्ही हा गुन्हा दाखल केला आहे,” अशी प्रतिक्रिया संजय सानप यांनी दिली आहे.

नांदगाव तालुका भाजपा आक्रमक : खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पदावरून हटवण्याची धमकी संजय राऊत यांनी दिली होती. याविरोधात नांदगाव तालुका भाजपा आक्रमक झाली असून भाजपाच्या वतीने मंडल अध्यक्ष संजय सानप यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानुसार, बदनामी करणं व धमकी देणं आशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, यापूर्वीही मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याबद्दल दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल होता.

 

…तर आम्ही देखील गप्प बसणार नाही : “राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद असतात. वैचारिक असो किंवा इतर असो मतभेद असणं, ही चांगली गोष्ट आहे. खासदार संजय राऊत असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचे नेते त्यांनी आमच्या भाजपाच्याच नाही तर इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे. समोरच्या व्यक्तीची इज्जत जाईल किंवा त्यांना खाली बघावं लागेल असं वक्तव्य करू नये. तसंच धमक्या देखील दिल्या नाही पाहिजे. मात्र जर असे पुन्हा पुन्हा घडत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. पक्षानं आपल्या अशा नेत्यांना आवरावं, अन्यथा भाजपा देखील जशास तसं उत्तर देण्यासाठी तत्पर असेल,” असं संजय सानप यांनी म्हटलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.