उद्धव ठाकरे तब्बल 22 वर्षांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्तानं दाखल; सहकुटुंब घेतलं गणपतीचं दर्शन!
गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले.

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी पुन्हा एकदा जनतेला सकारात्मक संदेश दिलाय. बुधवारी (27 ऑगस्ट) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेतलं. दरम्यान, तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्तानं आले होते.
राज ठाकरेंच्या घरी गणपतीचं दर्शन : गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरेही उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत: फोन करत उद्धव ठाकरेंना गणपतीला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण स्वीकारात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान, 2003 मध्ये श्रीकांत ठाकरे यांच्या निधनाच्यावेळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या आधीच्या निवासस्थानी आले होते. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी दाखल झाले.
ठाकरें बंधूंच्या भेटीगाठीत वाढ : नजीकच्याकाळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची ही तिसरी वेळ आहे. आधी 5 जुलै रोजी वरळी डोममधील मराठी भाषेचा विजयी मोर्चा, त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. यानिमित्त राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. कारण आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र लढण्याची सध्या चर्चा सुरू आहे. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाढत चाललेला संवाद हा दोन्ही बाजूंकडील कार्यकर्त्यांमध्ये आणि मुंबईकर मतदारांमध्ये उत्साह वाढवणारा दिसून येतोय.
बाप्पा दोन्ही भावांना एकत्र राहण्याची सद्बुद्धी देवो – मुख्यमंत्री : गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, “आज गणेशोत्सवानिमित्त दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. बाप्पा दोन्ही भावांना एकत्र राहण्याची सद्बुद्धी देवो”. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, यासाठी मुंबईतील गिरगाव परिसरात काही ठिकाणी पुन्हा एकदा दोन्ही भावांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं, अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते.
शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या बाप्पाकरता आकर्षक सजावट : राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीकरता शिवतीर्थ हे अतिशय सुंदर पद्धतीनं सजवल्याचं पाहायला मिळतंय. राज ठाकरे हे दरवर्षी आपल्या घरी असलेल्या चांदीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. राज ठाकरे याठिकाणी राहायला आल्यावर अनेक राजकीय नेते शिवतीर्थवर येऊन गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा आल्यानं उद्धव ठाकरे हे कधीही शिवतीर्थवर आले नव्हते. मात्र, आता गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी आले आहेत. या सगळ्यामुळं मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

