“मी फक्त आशिष शेलारांना ओळखते, बाकी कोणा राजकारण्याला ओळखत नाही”, ठाकरे बंधूंच्या युतीवर आशा भोसलेंचं विधान
ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल दिसतील, असं म्हटलं जात आहे. यावर आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा निघणार आहे. गुरुवारी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केली. या मोर्चाला उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला असून, येत्या 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चात दोन्ही भाऊ महाराष्ट्रातल्या जनतेला मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत. तसंच ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल दिसतील, असं म्हटलं जात आहे. यावर आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
…इतर कोणत्याही राजकारण्याला ओळखत नाही : ज्येष्ठ गायिका आशा भोसले या ठाकरे कुटुंबीयांच्या जवळच्या मानल्या जातात. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जातं. आता ठाकरे बंधू पहिल्यांदाच हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात एकत्र येणार असल्यामुळं पत्रकारांनी आशा भोसले यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावेळी त्या म्हणाल्या की, “मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते. बाकी इतर कोणत्याही राजकारण्याला ओळखत नाही,” अशी प्रतिक्रिया आशा भोसले यांनी दिली. तसंच, हिंदी भाषा अनिवार्य मुद्द्यावर विचारलं असता, “राजकारणावर बोलणार नाही”, असंही आशा भोसले म्हणाल्या.
राज्यात मराठीच सक्तीची : दरम्यान, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाबाबत सांस्कृतिक मंत्री व भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “इथं प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मराठीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. या राज्यात मराठीच सक्तीची आहे. भाजपा मराठीसाठी कट्टर आहे. भाजपा आणि केंद्र सरकारमुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. हिंदी भाषा सक्तीची नाही. पर्यायी भाषा म्हणून हिंदी आहे. काही लोकं गैरसमजाचे बळी आहेत. तर काही लोकांनी गैरसमज, अनावधानानं किंवा प्रयत्नपूर्वक अपप्रचार करू नये. जे सत्य आहे, ते लोकांसमोर मांडावं,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
सरकार म्हणून चर्चेला आम्ही तयार : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारावी, अशी मागणी केली आहे. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “सदावर्ते यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. असा विचार देखील डोक्यात नाही. तसंच प्रत्येकाला लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. अंतिमतः निर्णय पोलीस घेतील. सरकार म्हणून चर्चेला आम्ही तयार आहोत. त्यामुळं गैरसमजाचे बळी पडू नका असा सल्ला आहे,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
… तर राजकारणाच्या पद्धतीनेच उत्तर दिलं जाईल : याचबरोबर, “संजय राऊत आज अमित शाह यांच्यावर टीका करत आहेत. पण, संजय राऊत यांना आणि त्यांच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे की, काँग्रेसनं यावर निर्णय घेतलेला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाला शरद पवारांनी पाठिंबा दिला होता. आज तुमचे जे आका आहेत. यांनीच त्रिभाषा सूत्रीचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईच्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही शासनाची बाजू समजावून सांगू. या विषयाच्या अडून कोणी राजकारण करत असेल तर त्याला राजकारणाच्या पद्धतीनेच उत्तर दिले जाईल,” असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येणार? : दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच महाराष्ट्रात सध्या हिंदी सक्तीचा विषय चर्चेत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अशातच आता हे ठाकरे बंधू हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एका राजकीय कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. त्यामुळं दोन भावंडांच्या मनोमिलनाचे हे पहिले पाऊल मानलं जात आहे.

