लाभार्थ्याच्या पुन्हा लांबच लांब रांगा; तालुकानिहाय भांड्यांचे वाटप केव्हा?
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना २७५८ पेट्यांचे वाटप

बडनेरा : केंद्र सरकारच्या कामगार कल्याण खात्याकडून इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाच्या वाटपात सोमवारीदेखील लाभार्थ्यांची मोठी झुंबड होती. तालुकानिहाय पेट्यांचे वाटप केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यरात्रीपासून ताटकळत थांबलेल्या एका महिलेस गर्दीच्या त्रासामुळे अॅम्ब्युलन्सने उपचारासाठी नेले गेले.
दाभा येथील गोदाम परिसरात १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप होत आहे. ४ सप्टेंबर रोजी तुडुंब गर्दीने येथे मोठा गोंधळ उडाला होता. पेट्यांची कमतरता, सर्व्हर डाउनचे कारण सांगण्यात आले होते. त्यानंतर सोमवार ८ सप्टेंबरला पुन्हा पेट्यांचे वाटप करण्यात आले. मध्यरात्रीपासून लाभार्थी रांगेत उभे होते. गुरुवारी पावसाने तर सोमवारी उकाड्याने रांगेतील लाभार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महिला लाभार्थ्यांस सहायक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण हे केंद्राच्या ठिकाणी उपस्थित होते.
वाटप केंद्रापासून धारणी १७५ किलोमीटर…
पेटी घेण्यासाठी धारणीवरून आलेल्या लाभार्थ्याला १७५ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. सर्वच तालुक्यातील लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. तालुकानिहाय पेट्यांचे वाटप केल्यास लाभार्थ्यांसाठी सोयीचे ठरेल अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सोमवारी २७५८ पेट्यांचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना तालुकानिहाय पेट्या मिळाव्या यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे. सुरळीत, शांततेत पेट्यांचे वाटप होते आहे.
श्रद्धा वाघमारे, सहायक कामगार आयुक्त, अमरावती.
महिला लाभार्थ्यास पेटीचा भार झेपे ना..
प्रत्यक्ष पेटी मिळण्याच्या ठिकाणापासून बऱ्याच लाभार्थ्यांनी आपल्या गाड्या एक किलोमीटर लांब यवतमाळ मार्गालगत ठेवल्या होत्या. प्रत्येक महिलांना ही वजनी पेटी डोक्यावर घेऊन एक किलोमीटर दूरपर्यंत जावे लागले.

