मेळघाटातील नरभक्षी वाघाला इतरत्र हलविण्याच्या हालचाली

परतवाडा : अवघ्या तीन महिन्यात
मेळघाटात घडलेल्या पाच घटनांमधील पाच जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नरभक्षी वाघाला इतरत्र हलविण्यावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या नरभक्षी वाघाला इतरत्र हलविण्यापूर्वी त्याचा शोध घेतल्या जात आहे. त्याकरिता त्या क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला आहे. एक विशेष पथकही
त्याकरीता गठित करण्यात आले आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा येथे ऑगस्टमध्ये घडलेल्या घटनेतील वाघ अजूनही कॅमेरा ट्रॅपमध्ये अडकलेला नाही. त्याचे छायाचित्र मिळालेले नाही. गस्तीवरील पथकालाही तो आढळून आलेला नाही. दरम्यान, काही दिवसातच राजदेव बाबा कॅम्प परिसरात रोजंदारीवरील वनमजुराला वाघाने ठार केल्याची घटना घडली. राजदेव बाबा कॅम्प परिसरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आदिवासी बांधवांकडून अधिकच रोष व्यक्त केल्या गेला. या वाघाचाही शोध घेण्याकरिता
परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. गस्तही वाढविण्यात आली आहे. पण अजूनही तो वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये अडकलेला नाही. कुलंगणा आणि राजदेव बाबा या दोन्ही घटनेतील वाघ एकच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कुलंगणा आणि राजदेव बाबासह लगतच्या परिसरात जवळपास सात वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही घटनेतील वाघ नेमका कोणता याचा शोध लागल्यानंतर त्या वाघाला जेरबंद करून मेळघाट बाहेरील जंगलात सोडण्यात येणार आहे. या दोन्ही घटनांपूर्वी हरिसाल परिसरात तीन घटना घडल्या
आहेत. या घटनांना जबाबदार पट्टेवाली (कॉलरवाली) वाघीण मूळची मध्य प्रदेशातील बैतुल येथून भ्रमंती करीत मेळघाटात दाखल झाली आहे. तिने मेळघाटात चार बछड्यांना जन्म दिला आहे.
आपल्या या बछड्यांच्या संरक्षणार्थ ती हरिसाल परिसरात भ्रमंतीवर आहे. हरिसाल परिसरात घडलेल्या घटनांनंतर व्याघ्र प्रकल्प संचालनालयाने या वाघिणीला जेरबंद करून मेळघाट बाहेर इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला आहे. तिची ही बछडे मोठी झाल्यानंतर या पट्टेवाल्या वाघिणीला इतरत्र हलविण्यात येणार आहे, तशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

