ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

गणपती विसर्जनादरम्यान राज्यात 9 जणांचा बुडून मृत्यू, तर 12 जण बेपत्ता

राज्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी विविध ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या. या घटना ठाणे, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव, वाशिम, पालघर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये घडल्या आहेत.

मुंबई : राज्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी विविध ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. रविवारी (7 सप्टेंबर) किमान 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यातील सततच्या पावसामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शेजारील मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातही विसर्जनादरम्यान दोन किशोरवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ठाण्यात तीन जण वाहून गेले; दोघांचे मृतदेह सापडले : शहापूर तालुक्यातील मुंडेवाडी येथे गणेश विसर्जनानंतर परतत असताना तिघं जण धरणाजवळील भार्गवी नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले, अशी माहिती शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुले यांनी दिली. दत्ता लोटे, प्रतिप मुंडे आणि कुलदीप जकारे अशी त्यांची नावे आहेत. “लोटे आणि मुंडे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, जकारे यांचा शोध सुरू आहे,” असंही तहसीलदार कासुले यांनी सांगितलं.

पुण्यात 5 जण वाहून गेले; तीन मृतदेह सापडले : जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन घटनांमध्ये 5 जण वाहून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. वाकी खुर्द येथे भामा नदीत दोन जण वाहून गेले, तर शेल पिंपळगाव येथे एक जण पाण्यात बुडाला. याशिवाय, पुणे ग्रामीण भागातील बिरवाडी येथे एक व्यक्ती घसरून विहिरीत पडला. तर खेड येथे 45 वर्षीय एक पुरुष पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनांनंतर आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित दोन जणांचा शोध सुरू आहे.

 

  • नाशिकमध्ये 5 जण वाहून गेले : गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात 5 जण पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सिन्नर आणि कळवण भागात या घटना घडल्या असून आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
  • नांदेडमध्ये तिघं वाहून गेले : नांदेड जिल्ह्यातील गंडगाव येथेही नदीत तिघेजण वाहून गेले. घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आलं असून त्यामध्ये एकाला वाचवण्यात यश आलं आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली.
  • जळगावातही दुर्घटना : जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये तीन जण पाण्यात वाहून गेले, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे.

वाशिम, पालघर, अमरावती आणि मुंबईतही घडल्या दुर्घटना : वाशिम जिल्ह्यात दोन जण पाण्यात बुडाले असून, त्यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर पालघरच्या विरार (पश्चिम) येथील नारंगी जेट्टीजवळ शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास विसर्जनादरम्यान तिघं नाल्यात वाहून गेले होते. सागरी अधिकाऱ्यांनी बोटीच्या मदतीनं त्यांना वाचवलं, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.अमरावती शहरात एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्याचा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे.मुंबईतील साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर रविवारी सकाळी गणेशमूर्तीचा विजेच्या तारेशी संपर्क आल्यानं एक व्यक्ती मृत पावला आणि 5 जण जखमी झाले. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मुंबईत 11 दिवसांत जवळपास 2 लाख गणेश मूर्तींचे विसर्जन : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार 11 दिवसांच्या गणेशोत्सवात एकूण 1,97,114 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. यामध्ये 1,81,375 घरगुती गणेश मूर्ती, 10,148 सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती, तसेच गौरी आणि हरतालिकेच्या 5,591 मूर्तींचा समावेश होता.

प्रमुख दिवसांवर आधारित विसर्जन संख्या खालीलप्रमाणे

  • दीड दिवसांचा गणपती : 60,434 मूर्ती
  • पाच दिवसांचा गणपती : 40,230 मूर्ती
  • सात दिवसांचा गणपती : 59,704 मूर्ती
  • अंतिम (11वा) दिवशी : 36,746 मूर्ती
  • शेवटच्या दिवशी विसर्जित झालेल्या मूर्तींपैकी 5 हजार 937 गणेश मूर्ती या सार्वजनिक मंडळांच्या होत्या. तर 30 हजार 490 मूर्ती घरगुती होत्या. यासोबतच 319 मूर्ती या गौरी देवीच्या असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
  • लालबागच्या राजाचं विसर्जन : प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीचं रविवारी रात्री 9:15 वाजता अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं. गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यावर तब्बल 34 तासांहून अधिक वेळानंतर हे विसर्जन पार पडलं.
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.