ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

शिवसेनेच्या दसऱया मेळाव्यातून दोन ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार? यात तथ्य किती, की सोडलेली नुसती पुडी?

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसू शकतात, अशी चर्चा आहे. यावर राजकीय विश्लेषक, मनसे आणि शिवसेना नेत्यांना काय वाटतं? जाणून घ्या...

मुंबई : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील दोन मोठे नेते आणि ठाकरे घराण्यातील उद्धव-राज हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते. यानंतर वेगवेगळ्या कारणावरून ते एकत्र येताना पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं, असे तमाम मराठी माणसाची इच्छा असल्याचं दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येते. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या घरी सहकुटुंब जात बाप्पाचे दर्शन घेतले होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र दहा मिनिटांची चर्चा झाल्याची माहिती समोर येते. तर आता गेल्या कित्येक वर्षापासूनची परंपरा असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना आमंत्रित केले जाणार का? किंवा उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना बोलावणार का? आणि राज ठाकरे यांची तोफ शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात धडाडणार का? अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

आमंत्रण दिलं जाईल का? हाच खरा प्रश्न : “याआधी राज ठाकरेंचा इतिहास पाहिला तर, राज ठाकरेंनी अनेकवेळा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. भूमिका बदलल्या आहेत. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत “लाव रे तो व्हिडिओ…” म्हणत भाजपावर टीकास्त्र डागले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्याच राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता राज ठाकरे हे वारंवार भूमिका बदलतात. हे सर्वांना माहिती झाले आहे. राज ठाकरेंच्या पक्षाची ताकद पाहता राज ठाकरेंना फारसं कोणी महत्त्व देतंय असं दिसत नाही. पण राज ठाकरे यांचा मूळ बेस पाहिला तर तो शिवसेनेचा आहे आणि आता जे त्यांना महत्त्व मिळतंय, ते शिवसेना (ठाकरे) आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळत आहे. तथापि जर राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचे आमंत्रण दिले तर, ते दसरा मेळाव्यात पाहायला मिळतील, असं मला वाटतं. पण मुळात त्यांना दसरा मेळाव्याचे आमंत्रण दिलं जाईल का? हाच खरा प्रश्न आहे. पण जर त्यांना आमंत्रण मिळाले तर ते नक्कीच दसरा मेळाव्यात दिसतील असे मला वाटते,”. असं मत राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना मांडलं.

आम्ही आमंत्रण देणार : दरम्यान, राज ठाकरे हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिसणार का? उद्धव ठाकरे राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचे आमंत्रण देणार का? आणि दोन ठाकरे बंधूंची तोफ दसरा मेळाव्यात धडाडणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात असताना, “आम्ही राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे आमंत्रण देणार आहोत. त्यामुळे नक्कीच राज ठाकरे हे दसरा मेळाव्यात दिसतील आणि यावेळेस दोन ठाकरे बंधू एकत्र दसरा मेळाव्यात दिसतील,” असा विश्वास माजी महापौर आणि शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना व्यक्त केला.

शेवटी निर्णय साहेबच घेतील : दोन ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आले. यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. तसेच आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून दोन भाऊ एकत्र येण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना आमंत्रण दिलं जाईल का? किंवा दसरा मेळाव्यात राज ठाकरे दिसणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, असा प्रश्न मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना विचारला असता, “ही चर्चा नेमकी कोण करतंय, मला माहिती नाही. पण जर दसरा मेळाव्याचे राज साहेबांना आमंत्रण आले तर शेवटी निर्णय राज साहेबच घेतील,” अशी प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली.

 

चर्चांना हवा कुठून मिळाली? : यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहू शकतात, असे संकेत शिवसेना (उबाठा) नेते सचिन अहिर यांनी दिले होते. “यंदाच्या दसऱ्याला एक चांगली बातमी मिळू शकते. कदाचित आमच्या पक्षाकडून राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं, ” असे वक्तव्य त्यांनी केलं होतं.

संजय राऊत यांनी शक्यता फेटाळली : “दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत मला माहिती नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा वेगळा मेळावा असतो. आमचही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे तसं होणं शक्य नाही. दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात,” असं म्हणत दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.