ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

स्थानिक निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन टेक्निक वापरणार, मतदार शोधण्यास होणार मदत

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्याना काही निर्देश दिले आहेत. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदारांची नावे तपासण्याचे App वापरणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिली. युती करण्याचा निर्णय होईलच, मात्र तुम्ही कामाला लागा. निवडणुकांमध्ये एक- एक मत महत्त्वाचं असतं. वाजपेयी यांचं सरकार एका मतानं पडलं होतं हे लक्षात ठेवा. मतदारांच्या याद्या नीट तपासून घ्या, बनावट मतदान होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे, असं एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. विधानसभा निवडणुकीत लोकांचा जनाधार मिळाला आहे. आपल्याला लाडक्या बहिणींनी दिलेली ओळख मिटता कामा नये, असं देखील शिंदे म्हणाले.

सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवा : स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. सरकारने घेतलेले निर्णय, आपण केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश शिंदे यांनी पदाधिकारी यांना दिले आहेत. “केलेल्या कामांची पोचपावती जनता देते, जे लोक लोकसभेत यश मिळाले तेव्हा ईव्हीएम, वोट चोरीवर बोलले नाहीत. मात्र, विधानसभेनंतर आक्षेप घेऊ लागले, हा मतदाराचा अपमान आहे. या स्थानिक निवडणुकीत त्यांना जनता धडा शिकवेल. लोकांनी त्यांना विरोधी पक्षनेता निवडावा इतके पण संख्याबळ दिले नाही,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करत, त्यांना अधिकाऱ्यांनी ओळखले नसावे कोण बोलत आहे, गैरसमजातून हा प्रकार झाला आहे, असं ते म्हणाले.

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही : “हैदराबाद गॅझेट संदर्भात अध्यादेश काढलाय. जे कुणबी आहेत, त्यांनी आणि ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनी नोंदी पुरावे द्यावे, त्यांना प्रमाणपत्र मिळेल. कुणावर अन्याय होणार नाही अशी सरकारची धारणा आहे. आम्ही सर्वांनी या अध्यादेशाबाबत छगन भुजबळ यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यांना सांगितलं होतं, तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ते पण म्हणले होते, अध्यादेश तपासून पाहू,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. “आरक्षणाबाबत आम्ही नवीन निर्णय घेतला नाही. या अगोदर ते झाले आहे, तीच पद्धत सोपी केली,” असं देखील शिंदे यांनी सांगितलं.

 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका : “‘लाडकी बहीण योजने’नं सर्वांचं गणित बदललं. महाराष्ट्रात कधीही इतक्या जागा मिळाल्या नाही, लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी यांनी मतदान केलं. आपण निवडणुकीत पलटवलेले राजकारण पाहिले. विधानसभेत सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता खालच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. निवडणुकीत तिकीट एकच असते, तुल्यबळ उमेदवार असतात. अनेकांना त्यात सामावून घेतलं जातं. जागा चांगल्या मिळाल्या की मिरवता येतं. मात्र, जागा नाही आली तर विरोधक डोक्यावर मिऱ्या वाटतात. ज्या जागा हरणार असं वाटत होतं त्या जागा आपण जिंकल्या. गेलेले लोक निवडून येणार नाही असं म्हणत होते. मात्र, तेच लोक शंभर जागा लढले आणि कमी जिंकून आले,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

कार्यकर्त्यांना दिला सल्ला : “स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांची यादी तपासावी, त्यात चूक होता काम नये. नाव शोधण्याचे App सर्वांना दिले जाईल. खोटे मतदार आले का याची काळजी घ्या. पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक करा, आपल्याला त्याचा संच महत्त्वाचा आहे. निवडणुका कधीही लागतील, आपल्याला नियमानं कामं करावी लागतील. सदरील App आजपर्यंत कोणीही वापरलं नाही. यादीचे महत्त्व आहे, हक्काची नावं टाका, चुकीची नावं काढा नाहीतर पराभवाला समोरं जावं लागेल. स्थानिक निवडणुका एक- दोन मतांनी पण हरतात ते लक्षात ठेवा,” असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.