देशाला आज मिळणार नवे उपराष्ट्रपती; 782 खासदार मतदान कसं करतील? निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घ्या
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून 782 खासदारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.

नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही निवडणूक आज मंगळवारी (9 सप्टेंबर) होणार आहे. एकाच दिवसात मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होणार आहे. एकूण 782 खासदार (लोकसभा आणि राज्यसभा) या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत. हे खासदार पुढचा उपराष्ट्रपती कोण होईल, हे ठरवतील.
भारतीय संविधानाच्या कलम 66 (1) नुसार, भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड खासदारांच्या निवडणूक मंडळाद्वारे केली जाते. या निवडणुकीसाठी मतदान आज सकाळी 10 वाजता संसद भवनात सुरू होईल. ही निवडणूक प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. भारतीय निवडणूक आयोगाला संविधानाच्या कलम 324 अंतर्गत या निवडणुकीचं आयोजन आणि नियंत्रण करण्याचा अधिकार आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण : मंगळवारी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ‘ईटीव्ही भारत’ला दिली. या निवडणुकीत एकूण 782 सदस्य (लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदानासाठी पात्र आहेत. संसद भवनातील वसुधा येथील कक्ष क्रमांक एफ-101 मध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान होईल. मतमोजणी सायंकाळी 6 वाजता सुरू होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाईल. मतदान प्रक्रियेबाबत माहिती देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “सहा सदस्य एका वेळेस मतदान कक्षात प्रवेश करू शकतात. त्यासाठी सहा स्वतंत्र केबिन्स तयार करण्यात आल्या आहेत, जिथे सदस्य त्यांच्या मतपत्रिकांवर चिन्हांकन करू शकतात आणि नंतर त्या मतपेटीत टाकू शकतात.” सर्व मतदारांना मतदानासाठी याच कक्षात उपस्थित राहावं लागेल.
पारदर्शकतेसाठी व्हिडिओग्राफी केली जाईल : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात लोकसभेचे माजी सरचिटणीस पी. डी. टी. आचार्य यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं, ही प्रक्रिया सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच असते. मात्र, मुख्य फरक एवढाच आहे की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) वापरली जातात. तर उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान मतपत्रिकेद्वारे केलं जातं. या निवडणुकीत मतदार म्हणून लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार मतदान करतात. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेनं व्हावी, यासाठी व्हिडिओ चित्रीकरण केलं जातं.
मतदान कसं करायचं? : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतदान कसं करायचं? याबाबत लोकसभेचे माजी सरचिटणीस पी. डी. टी. आचार्य यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, प्रत्येक खासदाराला सर्वप्रथम मतदान अधिकाऱ्यांकडे (RO) जावे लागेल, जिथे त्याला एक मतपत्रिका दिली जाईल. मतपत्रिकेत उमेदवारांची नावं वर्णमालानुक्रमाने सूचीबद्ध असतात. मतदार यादीतील संबंधित खासदाराच्या नावासमोर खूण करून मतपत्रिका वितरित केली जाते. यानंतर खासदार मतदानासाठी विशेष केबिनमध्ये जातील. तिथं ते आपलं मतदान करतील. मतदान केल्यानंतर ते मतपत्रिका मतपेटीत टाकतील. मतपेटी ही केबिनच्या मध्यभागी ठेवलेली असेल.
निरीक्षक लक्ष ठेवतात : मतदान प्रक्रियेवर उमेदवारांचे प्रतिनिधी आणि निवडणूक आयोगाचे निरीक्षक लक्ष ठेवतात. उमेदवाराचा प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकतो. कोणतीही अनियमितता आढळल्यास ती निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकतो. निवडणूक आयोगाचे निरीक्षक संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवतात, जेणेकरून निवडणूक पारदर्शक आणि नियमानुसार पार पडेल.
- उमेदवार मतदान करू शकतात का? : उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत माहिती देताना लोकसभेचे माजी सरचिटणीस पी. डी. टी. आचार्य यांनी स्पष्ट केलं की, उमेदवार फक्त ते खासदार असतील तरच मतदान करू शकतात. जर ते खासदार नसतील, तर त्यांना मतदानाचा अधिकार नाही.
- राजकीय गणित, संख्या बळ कोणाच्या बाजूने? : लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यसंख्येनुसार, सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) लोकसभेत 293 आणि राज्यसभेत 132 सदस्य आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉककडे लोकसभेत 234 आणि राज्यसभेत 77 सदस्य आहेत.
एनडीए आणि इंडिया आघाडीची जोरदार तयारी : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपाने रविवारी दिल्लीतील आपल्या खासदारांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेद्वारे मतदान प्रक्रियेची माहिती देणं आणि शिस्तबद्ध मतदान सुनिश्चित करणं, हा उद्देश होता. तर, इंडिया ब्लॉककडून सोमवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचं वर्णन एकतेचं प्रतीक म्हणून करण्यात आलं.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक का होत आहे? : उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यामुळे ही निवडणूक होत आहे. 21 जुलै रोजी, तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला. त्यामुळे हे पद अधिकृतपणे रिक्त झालं. धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत असणे अपेक्षित होते. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदासाठीच नवीन उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

