महाराष्ट्रातील खासदारांनी खरंच क्रॉस व्होटिंग केलं? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?
परस्परविरोधी दाव्यांमुळे महाराष्ट्रातील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं का, याबाबत संभ्रम निर्माण झालाय. यात नेमकं तथ्य काय, खरंच महाराष्ट्रातील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं का, याविषयीचा रिपोर्ताज.

मुंबई : एकीकडे विरोधी बाकांवरील नेते सत्ताधाऱ्यांविरोधात मोट बांधत असताना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तब्बल 14 मतं फुटल्यानं इंडिया आघाडीच्या ऐक्याला सुरुंग लागलाय. निकालानंतर नेमकी कुणाची मतं फुटली, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 7 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं, त्यातील 5 उबाठा गटाचे आणि 2 शरद पवारांचे असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर सूचक प्रतिक्रिया देताना ‘समझनेवाले को इशारा काफी है!’ असं म्हणत खळबळ उडवून दिलीय. दुसरीकडे शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी हा दावा फेटाळत, ‘आमचं एकही मत फुटलं नाही’, असा खुलासा केलाय. या परस्परविरोधी दाव्यांमुळे महाराष्ट्रातील खासदारांनी खरंच क्रॉस व्होटिंग केलं का, याबाबत संभ्रम निर्माण झालाय. यात नेमकं तथ्य काय आहे, खरंच महाराष्ट्रातील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं का, याविषयीचा खास रिपोर्ताज.
दोन्ही बाजूंकडून निवडणूक जिंकण्यासाठी जोरकस प्रयत्न : सत्ताधारी एनडीएकडे बहुमत असताना देखील इंडिया आघाडीनं उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार दिला. त्यामुळं दोन्ही बाजूंकडून निवडणूक जिंकण्यासाठी जोरकस प्रयत्न झाले. काही पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानं क्रॉस व्होटिंगची शक्यता बळावली. एनडीएची मतं फुटतील, असा दावा इंडिया आघाडीकडून करण्यात आलाय. मात्र, त्यांच्या अपेक्षेविरुद्ध एनडीएच्या सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मतं, तर इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. विजयासाठी 392 मतांची गरज होती. या निवडणुकीत एकूण 767 खासदारांनी मतदान केलं, त्यापैकी 15 मतं अवैध ठरली. 13 खासदारांनी (बीआरएस-4, बीजेडी-7, अकाली दल-1, अपक्ष-1) मतदान केलं नाही. मात्र, 14 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानं इंडिया आघाडीला धक्का बसला.
समझनेवाले को इशारा काफी है! – खासदार श्रीकांत शिंदे : या निवडणुकीत 25 हून अधिक मतं फुटतील, असं भाकीत श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीआधी वर्तवलं होतं. त्यानुसार घडल्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याविषयी विचारलं असता शिंदे म्हणाले, “सगळ्या पक्षातील खासदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. चांगल्या संबंधांचं फळ हे चांगलंच मिळत असतं. मला वाटतं हे फळ एनडीएला, मोदीजींच्या नेतृत्त्वाला मिळालेलं आहे. मी आधीपासून सांगत होतो, कोणाची किती मतं फुटणार, आम्हाला किती मिळणार. त्यामुळं ‘समझनेवाले को इशारा काफी है!'”, अशी सूचक प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यावर संजय राऊतांनी मात्र महाराष्ट्रातील खासदारांची मतं फुटल्याच्या दाव्याचा इन्कार केलाय.
10 मतं फुटली, पण ती महाराष्ट्रातील नाहीत – खासदार संजय राऊत : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 10 मतं फुटल्याची कबुली खासदार संजय राऊतांनी दिली. ते म्हणाले, “अवैध ठरलेल्या 15 मतांवरील खूण ही इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या नावासमोर होती. ती मतं अवैध ठरवण्यात आली. त्यानंतरही तुम्ही म्हणता क्रॉस व्होटिंग झालंय. ज्यांच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद, पैसा आहे, त्यांना फक्त 10 मतंच इकडे-तिकडे करता आली. ही 10 मतं कोणती असावीत, याचा अंदाज आम्हाला पहिल्यापासून होता. हा संशय देशभरातला आहे. कोणत्याही एका राज्यातला नाही. कोण कोणाला भेटलं, कोणी कोणाला चहाला बोलावलं, हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडे पॅगासेस असेल, तर आम्हाकडे बरेच अॅक्सिस आहेत”, असंही राऊत म्हणाले.
राधाकृष्णन जिंकले असले, तरी नैतिकदृष्ट्या विजय आमचा – खासदार वर्षा गायकवाड : याविषयी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यश मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी या निवडणुकीत जोरदार लढा दिला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी लढवलेली लढाई केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नव्हती, तर लोकशाही आणि संविधानाला कमकुवत करण्याचा चंग बांधलेल्या हुकूमशाहांविरोधातला हा वैचारिक लढा होता. संपूर्ण विरोधी पक्ष या लढ्यात खंबीरपणे एकत्र उभा राहिला. ही निवडणूक भाजपानं जरी जिंकली असली, तरी विरोधकांनी नैतिक विजय मिळवला. रेड्डी यांना 40 टक्के मते मिळाली, जी 2022 च्या उपराष्ट्रपती निवडणुकीतील 26 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. हुकूमशाही विरोधातील आमचा वैचारिक लढा यापुढेही अधिक जोमानं सुरू राहील”, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसचं एकही मत फुटलं नाही – खासदार कल्याण काळे : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जी 14 मतं फुटली, त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसची मत फुटल्याचे दावे केले जात आहेत. याविषयी काँग्रसचे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांना विचारलं असता, ते म्हणाले, “आमचं एकही मत फुटलेलं नाही. जे बोलत आहेत, त्यांचीच मतं फुटली असावीत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विरोधक तोंडावर आपटले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं. ते म्हणाले, “निवडणुकीपूर्वी विरोधकांनी मोठमोठ्या गप्पा मारल्या, एनडीएची मतं फोडण्याचे दावे देखील केले. पण प्रत्यक्षात उलटच घडलं. विरोधकांना स्वत:ची मतं सांभाळता आली नाहीत, उलट त्यांची काही मतं थेट एनडीएच्या उमेदवाराला गेली. फेक नॅरेटीव्ह तयार करून शेवटी अपयश पत्करणं, हीच विरोधकांची स्थिती आहे. या निवडणुकीतही ते तोंडावर आपटले”, अशी खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
उबाठा गटाचे 80 टक्के लोकप्रतिनिधी संपर्कात – कृपाल तुमाने : उबाठा गटाचे 80 टक्के आमदार आणि खासदार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. ते म्हणाले, “त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून उर्वरित सर्व आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. आमचा दसरा मेळावा झाला की, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित करू. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी खासदार संजय राऊत यांच्याबाबत आहे”, असंही त्यांनी सांगितलंय.

