परतवाडा हादरला: अल्पवयीन मुलींच्या व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीच्या घरावर पालिकेची कारवाई; शहरात कडकडीत बंद, संतप्त वातावरण

परतवाडा/अचलपूर सचिन इंगळे जिल्हा प्रतिनिधी : अल्पवयीन मुलींशी संबंधित अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाल्याच्या गंभीर प्रकरणाने अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांना अक्षरशः हादरवून सोडले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद (१९) याच्याविरोधात पोलिस कारवाई सुरू असतानाच, नगरपालिका प्रशासनाने त्याच्या निवासस्थानावरील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कठोर पावले उचलली. या घडामोडींमुळे बुधवारी शहरात तीव्र संताप व्यक्त झाला असून, व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळत निषेध नोंदविला.
घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडे पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारींवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. संबंधित घरावरील अतिक्रमित भागाबाबत नोटीस बजावण्यात आली होती. बुधवारी सकाळी एसडीओ डॉ. शुभम कुमार, मुख्याधिकारी डॉ. धीरज गोहाड यांच्या उपस्थितीत कारवाई राबविण्यात आली. बुलडोझरच्या सहाय्याने घरास लागून असलेला लोखंडी जिना, जो अतिक्रमणात येत असल्याचे आढळले, तो हटविण्यात आला. उर्वरित बांधकामाबाबतही नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालिकेच्या सूत्रांनुसार, या संदर्भातील पहिली तक्रार सुमारे दीड महिन्यापूर्वी प्राप्त झाली होती. त्यानंतर अतिक्रमणाबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान, अलीकडेच घराच्या वाढीव बांधकामासंदर्भातही नव्याने तक्रार प्राप्त झाल्याने प्रशासनाने कारवाईला गती दिली. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर चौकटीत आणि नियमानुसार पार पाडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील कथित व्हिडिओ व छायाचित्रांच्या संख्येबाबत समोर आलेल्या माहितीनंतर शहरात संतापाचे वातावरण अधिक तीव्र झाले. नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरही चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत बुधवारी सकाळपासूनच अचलपूर व परतवाडा येथील बहुतांश बाजारपेठा बंद राहिल्या. अनेक ठिकाणी नागरिक एकत्र येऊन निषेध व्यक्त करताना दिसून आले.
परिस्थिती लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने शहरातील संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या; मात्र पोलिसांनी अशा कोणत्याही अनुचित घटनेचा इन्कार करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित आरोपीविरोधात कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रशासन व पोलिस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

