आम्ही उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरू देणार नाही; मदतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जाहीर
शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे (उबाठा) 'हंबरडा मोर्चा' काढण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
पुणे : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे (उबाठा) ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे विरोधी पक्षाचं काम असून, त्यांना विश्वास आहे की, मदत ही मिळणार आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरू देणार नाही. आम्ही शेतकऱयांना मदत देणार आहोत.”
मदत देण्याचं काम सुरू झालं आहे : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जे पॅकेज जाहीर झाले आहे, ते कधीपर्यंत दिलं जाणार आहे? याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मदत देण्याचं काम सुरू झालं आहे. पहिला टप्पा हा दिला आहे. जास्तीत जास्त मदत ही दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न आहे.”
परिस्थितीचा आढावा घेत आहोत : यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्याचे पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचा दौरा ठेवलेला आहे. या दौऱ्यामध्ये त्या विभागातल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीचा आढावा घेत आहोत. या आढावा बैठकीत मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती अन् आता काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेत आहोत. युतीच्याबाबतही आम्ही आढावा घेत आहोत. त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेत आहोत. पक्षाची संघटना म्हणून बूथची रचना कशी असेल, निवडणूक संघटना कशी असेल अशा सगळ्या गोष्टी संदर्भात चर्चा करून पुढचे दिशा-निर्देश देण्याचा प्रयत्न आहे. आजच्या आढावा बैठकीत मंत्री, आमदार, सदस्य सर्व आले होते. अतिशय सकारात्मक परिस्थिती पाहायला मिळत आहे. युतीच्या संदर्भात सर्व निर्देश हे जिल्हा पातळीवर देण्यात आले आहेत.”
वैयक्तिक टीका कोणी करू नये : ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत फडणवीस म्हणाले, “भिडे गुरुजी यांची जी मोहीम आहे त्याबाबत ते निमंत्रण देण्यासाठी आले होते. डिसेंबर महिन्यात त्यांची मोहीम असून, याबाबत त्यांनी निमंत्रण दिलं.” गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद संपत नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, “जयंत पाटील आणि पडळकर यांच्यामधील वैयक्तिक टीकेवर आमचा देखील आक्षेप होता. वैयक्तिक टीका कोणी करू नये, असं सर्वांचं मत आहे. आम्ही पडळकर यांना देखील सांगितलं आहे. बाकी राजकीय आरोप प्रत्यारोप हे होत राहतात.”
‘ते’ अतिशय त्यागाने जीवन जगतात : जैनमुनी यांनी पक्ष काढत जी काही टीका केली आहे, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुणी केलं हे मला माहिती नाही. जे सगळे जैन मुनी आहेत ते अतिशय त्यागाने जीवन जगतात. सगळ्यांना जगण्याचा उत्तम मार्ग ते सांगतात. अपरिग्रह शिकवण्याचं काम जैनमुनी करतात. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. जे कोणी काही बोलले असेल तर ते मला माहिती नाही.”

