जम्मू काश्मीर : कुपवाडामध्ये एलओसीजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टर आणि दुदनियालजवळ नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सोमवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेवर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. सद्यस्थितीत त्या भागात सुरक्षा दलांचे शोधमोहीम सुरू आहे.
सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न : सेनेने दिलेल्या निवेदनानुसार, सोमवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. भारतीय लष्कराच्या जवानांनी या हालचालींचं गांभीर्य ओळखून तत्काळ कारवाई केली. संध्याकाळी सुमारे 7 वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल अधिक सतर्क : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल अधिक सतर्क झाले आहेत. प्रत्येक संशयिताची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. दहशतवाद संभाव्य भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. सीमेपलीकडून भारतात दहशत पसरवण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत.
स्थानिक पातळीवर मदत करणाऱ्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त : पूर्वीच्या तुलनेत सध्या जम्मू-काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती लक्षणीयरीत्या बदलली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत करणाऱ्या काही जणांचा पर्दाफाश झाला आहे. या ग्रासरूट स्तरावरील मदतनीसांची ओळख पटवून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांचा एकामागून एक खात्मा करण्यात आला आहे. यासोबतच दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्या संघटनांचे नेटवर्कही उद्ध्वस्त करण्यात आलं असून, त्यांची मुळं उपटून टाकण्याचं काम सुरू आहे.
श्रीनगर पोलिसांनी सोमवारी प्रतिबंधित संघटना जमत-ए-इस्लामी (JEI) आणि हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित व्यक्तींविरुद्ध समन्वित शोधमोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकून तपास करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि फुटीरतावादी यंत्रणा उद्ध्वस्त करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. या मोहिमेद्वारे या संघटनांच्या समर्थक नेटवर्कला आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना थेट लक्ष्य करण्यात आलं आहे.

