ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मतदार यादीतील घोटाळ्यामागे भाजपाचा पदाधिकारी; डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधार कार्ड दाखवत रोहित पवारांचा गंभीर आरोप

मतदार याद्यांमध्ये झालेल्या फेरफारांमागे नियोजित ‘मेथडोलॉजी’ असल्याचा गंभीर रोहित पवार यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा आणि मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. पवारांनी निवडणूक यंत्रणेमधील त्रुटी आणि गैरप्रकार अधोरेखित करताना चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं त्यांनी आधारकार्ड दाखवलं.

जर ट्रम्प यांचंही आधारकार्ड तयार होऊ शकतं, तर मग अनेकजण खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट आधारकार्ड तयार करून मतदार ओळखपत्र मिळवत असावेत. या प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं.

‘बाहेरची लोकं आणून मतदान केलं’ : रोहित पवारांनी पुण्यातील काही विधानसभा मतदारसंघांतील मतदारसंख्या वाढीबाबत गंभीर संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की, शिरूर मतदारसंघात 10,230, वडगाव शेरीत 11,064, खडकवासला मतदारसंघात 12,330, पर्वतीत 8,238 आणि हडपसरमध्ये तब्बल 12,798 नव्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्यांनी दावा केला की, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या नोंदींची प्रत्यक्ष जाऊन पडताळणी केली असता संबंधित नावांचा पत्ता त्या भागांमध्ये कुठेच सापडला नाही. पवारांनी असाही आरोप केला की, काही ठिकाणी बसने लोकांना आणून बनावट ओळखपत्रांच्या आधारे मतदान करवून घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावात परत नेऊन सोडण्यात आलं.

  • रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत ‘डोनाल्ड तात्या ट्रम्प’ या नावाचं बनावट आधारकार्ड दाखवत मतदार याद्यांमधील फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकांनंतरही हजारो बनावट नावांचा शिरकाव मतदार यादीत झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाप्रमाणं अनेक बनावट मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेमागे भाजपाचे पदाधिकारी देवांग दवे : मतदार याद्यांमध्ये झालेल्या फेरफारांमागे नियोजित ‘मेथडोलॉजी’ असल्याचा गंभीर आरोप केला. पवारांनी दावा केला की, या संपूर्ण प्रक्रियेमागे भाजपाचे पदाधिकारी देवांग दवे यांचा सक्रिय सहभाग आहे. मतदार यादीत कोणाची नावं समाविष्ट करायची, कोणाची वगळायची आणि किती प्रमाणात बदल करायचे, हे सर्व ठरवून करण्यात आलं आहे.

पवारांच्या मते, देवांग दवे यांनी ही संपूर्ण यंत्रणा डिझाईन केली आहे. ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आणि इंटरनेट सिस्टीमची जबाबदारी देवांग दवे यांच्याकडे आहे. जर ते भाजपाचे पदाधिकारी असतील तर आयोगातील गोपनीय माहिती त्यांच्याकडे आधीपासून पोहोचत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तीच माहिती विरोधी पक्षांनी मागितली असता नाकारली जाते, असा आरोप करत रोहित पवारांनी निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित पवारांनी केलेल्या मागण्या :

1) डिजिटल मतदार याद्या सर्व पक्षांना उपलब्ध करून द्याव्यात.

2) बीएलओ डायऱ्यांमधील नोंदींचा खुलासा व्हावा.

3) मतदानाच्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावं.

4) मतदार यादीतील नव्या नावांची पडताळणी स्वतंत्र संस्थेकडून व्हावी.

‘शेवटच्या एका तासात 68 लाख मतदान’ : पवारांनी पुढे बोलताना सांगितलं की, निवडणुकीच्या शेवटच्या एका तासात तब्बल 68 लाख मतदान झालं. हे मतदार नेमके कोण होते, याची संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, पनवेल, कल्याण ग्रामीण, भोसरी, मीरा-भाईंदर, नालासोपारा, चिंचवड आणि हडपसर या मतदारसंघांमध्ये केवळ 6 महिन्यांत झालेल्या मतदारवाढीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पनवेलमध्ये 65,000, कल्याण ग्रामीणमध्ये 57,000 , भोसरीत 56,000, मीरा-भाईंदरमध्ये 53,000, नालासोपाऱ्यात 50,000, चिंचवडमध्ये 45,000 आणि हडपसरमध्ये 43,000 नव्या मतदारांची नोंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पवार म्हणाले की, ही वाढ नैसर्गिक नसून ठरवून आखलेली योजना असल्याचा संशय आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे या संपूर्ण प्रकाराबाबत लेखी स्पष्टीकरण मागितलं आहे. मतदार याद्यांतील अनियमितता तातडीने तपासली नाही, तर लोकशाहीच्या भविष्यास धोका निर्माण होईल, असा इशाराही दिला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.