२५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स… शफाली, दीप्ती अन् श्री चरणी…
मुबंई :भारतीय महिला क्रिकेट संघाची अखेर स्वप्नपूर्ती झाली… यापूर्वी दोनवेळा फायनलमध्ये पोहोचून जेतेपदाने दिलेल्या हुलकावणीची सल मनाला टोचत होती..
त्यात २०१७ च्या फायनलमधला पराभव जिव्हारी लागलेला… २०२५ मध्ये आलेली संधी काही केल्या सोडायची नाही, याच इराद्याने हरमनप्रीत कौरचा संघ मैदानावर उतरला अन् दक्षिण आफ्रिकेवर विजयाची नोंद करून महिला वन डे वर्ल्ड कप नावावर केला. शफाली वर्मा ( Shafali Verma) या विजयाची नायिका ठरली. भारतीय संघाने २५ वर्षांपूर्वी पाहिलेले वर्ल्ड कप विजयाचे आज सत्यात उतरले..
शफाली व स्मृती यांची विक्रमी भागीदारी…
शफालीने ७८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८७ धावा केल्या, तर स्मृती मानधनाने ५८ चेंडूंत ८ चौकारांसह ४५ धावांची खेळी करत पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. पण, यानंतर भारताचा डाव गडगडला आणि ३२५ धावांचे स्वप्न पाहणाऱ्या संघाला २९८ धावांपर्यंतच समाधान मानावे लागले.
अमनजोतचा अप्रतिम थ्रो…
लक्ष्याचा पाठलाग कर्णधार लॉरा वुल्वार्डने अप्रतिम खेळ केला, परंतु तिच्यासोबतीला कोण उभी राहिली नाही. तझमिन ब्रिट्सला ( २३) अमनजोत कौरने अप्रतिम थ्रोवर रन आऊट केले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. लॉरा मैदानावर एका बाजूने खिंड लढवत राहिली, परंतु दुसऱ्या बाजूने विकेट्स पडल्या.
शफालीची गोलंदाजीत कमाल…
कर्णधार हरमनप्रीत कौरने अचानक शफालीला गोलंदाजीला आणले आणि तिने सून लूस ( २५) व मॅरिझाने काप ( ४) यांना बाद करून मॅचला कलाटणी दिली. लॉराला अखेर एनेरि डेर्कसेनची साथ मिळाली आणि दोघींनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी करून सामना जिवंत ठेवला होता.
दीप्ती शर्माने फिरवला सामना…
विजयासाठी ९० धावा हव्या असातना एनेरिला ( ३५) दीप्ती शर्माने चतुराईने त्रिफळाचीत केले. त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात लॉरा झेलबाद झाला. अमनजोतकडून चेंडू निसटला होता, परंतु तिसऱ्या प्रयत्नात तिने झेल टिपला. लॉरा ९८ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह १०१ धावांवर बाद झाली. महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक झळकावणारी ती पहिली कर्णधार ठरली. दीप्तीने नंतर मॅच पूर्णपणे भारताच्या तराजूत झुकवला. तिने क्लोए ट्रायनला ( ९) पायचीत केले.
क्षेत्ररक्षणातील चुका वेळीच सुधारल्या..
भारतीय संघाने फायनलमध्ये क्षेत्ररक्षणात चुका केल्या.. झेल सोडले, सोपे रन आऊट सोडले.. पण, या चुका वेळीच सुधारून भारताने विजय निश्चित केला. नॅडिने डी क्लेर्कने सुरेख फटके मारून आफ्रिकेला आशा दाखवली होती, परंतु अयाबोंगा खाकाला दीप्ती शर्माने अचूक थ्रो करून रन आऊट केले आणि आफ्रिकेची नववी विकेट पडली. आफ्रिकेचा संपूर्ण संघ २४६ धावांत तंबूत पाठवून भारताने ऐतिहासिक विजय पक्का केला. दीप्तीने पाच विकेट्स घेतल्या.

