सीताबाई संगई शाळेची ईश्वरी ठरली सुपर स्केटर — विभागीय स्पर्धेत दाखवणार दम!

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अमरावती जिल्हा क्रीडालयातर्फे आयोजित आणि विभागीय क्रीडा कार्यालयाच्या स्केटिंग रिंगवर नुकत्याच पार पडलेल्या स्केटिंग स्पर्धेत अकरा वर्षाखालील गटातून सीताबाई संगई प्राथमिक शाळेची वर्ग चौथीची विद्यार्थिनी ईश्वरी अजय इथापे हिने उल्लेखनीय कामगिरी करत आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
या स्पर्धेत ईश्वरीने रिंग वन रेसमध्ये द्वितीय क्रमांक, तर रिंग टू रेसमध्ये तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा व पालकांचा गौरव वाढविला आहे. तिच्या या यशामुळे ती आता विभागीय शालेय रोलर स्पर्धेसाठी पात्र झाली असून ही स्पर्धा येत्या 23 व 24 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये विभागून आयोजित करण्यात आली होती, ज्यात सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे वातावरण उत्साहपूर्ण होते आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्तम स्पर्धात्मक भावना दिसून आली.
ईश्वरीच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अविनाश संगई, उपाध्यक्ष डॉ. उल्हास संगई, सचिव विवेक संगई, सहसचिव प्रसाद संगई, अजय संगई, मुख्याध्यापक अनिल जुनघरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

